इराणचा अणुकार्यक्रम लष्करी आहे

- इराणच्या अणुऊर्जा संस्थेच्या माजी प्रमुखाची खळबळजनक कबुली

लष्करीतेहरान/मॉस्को/व्हिएन्ना – ‘इराणच्या अणुकार्यक्रमामागे लष्करी हेतू आहे. म्हणूनच इस्रायल याकडे धोका म्हणून पाहत आहे. वर्षभरापूर्वी इस्रायलने मोहसिन फखरीझादेह यांची हत्या केली कारण अणुकार्यक्रमावर काम करणार्‍या फखरीझादेह यांच्यापासून इस्रायलला धोका होता’, अशी खळबळजनक कबुली इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे माजी प्रमुख फेरेदून अब्बासी-दवानी यांनी दिली. व्हिएन्ना येथील बैठकीत अमेरिका, इराणमध्ये अणुकरारावर वाटाघाटी सुरू आहेत. अण्वस्त्रे संपादन न करण्याच्या मोबदल्यात अमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घेण्याची तयारी दाखविल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत, दवानी यांची घोषणा अमेरिकेसह व युरोपिय देशांसाठी इशाराघंटा ठरते.

गेल्या कित्येक वर्षांपासून आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे नागरी असल्याचा दावा इराणचे सरकार करीत आहे. त्याचबरोबर अण्वस्त्रांची निर्मिती आपल्या धोरणांच्या विरोधात असल्याचे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी आदेश काढले होते. पण कितीही आरडाओरडा करीत असला तरी इराणचा अणुकार्यक्रम लष्करी असून हा देश छुप्यारितीने अणुबॉम्बची निर्मिती करीत असल्याचा आरोप इस्रायल सातत्याने करीत आहे. दोन वर्षांपूर्वी इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधी पुरावे जगासमोर प्रसिद्ध केले होते. तेव्हाही इराणने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते.

लष्करीपण इराणच्याच अणुऊर्जा संस्थेचे माजी प्रमुख दवानी यांनी सरकारी वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या देशाचा अणुकार्यक्रम लष्करी असल्याची कबुली दिली. त्याचबरोबर आयातुल्ला खामेनी यांनी अण्वस्त्रसज्जतेच्या विरोधात फर्मान काढले असले तरी अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांनी लष्करी अणुकार्यक्रमावर काम सुरू केले होते, अशी माहिती दवानी यांनी दिली. इराणच्या अणुऊर्जा संस्थेच्या माजी प्रमुखाची ही कबुली इराणला अडचणीत टाकणारी ठरू शकते. तसेच यामुळे आखातात अण्वस्त्रस्पर्धा भडकेल, असा दावा आखातातील विश्‍लेषक करीत आहेत.

लष्करीअसे असले तरी व्हिएन्ना येथे वाटाघाटी करीत असलेली अमेरिका इराणवर कारवाई करणार नसल्याचा दावा रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन अणुकरारासाठी इराणवरील निर्बंध मागे घेण्यासाठी तयार असल्याची माहिती या वाटाघाटीसाठी रशियाने नियुक्त केलेले विशेषदूत मिखायल युल्यानोव्ह यांनी दिली. अमेरिका इराणला पूर्णपणे निर्बंधमुक्त करण्यासाठी तयार आहे. पण बहुराष्ट्रीय वाटाघाटीत ते शक्य नसल्यामुळे अमेरिका सध्या काही निर्बंध मागे घेईल, असा दावा युल्यानोव्ह यांनी केला. सोमवारपासून व्हिएन्ना येथे सुरू झालेल्या सातव्या फेरीतील चर्चेबाबत युरोपिय महासंघ मोठी आशा ठेवून असल्याचे महासंघाचे राजनैतिक अधिकारी एन्रीक मोरा यांनी म्हटले आहे. पण इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी पुन्हा एकदा या वाटाघाटीत सहभागी झालेल्या अमेरिका, युरोपिय महासंघाला सावध केले. अणुकरार करण्यासाठी इराण पाश्‍चिमात्य देशांना ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप बेनेट यांनी केला. त्याचबरोबर इस्रायलच्या विनाशाचा आपला हेतू इराणने कधीही दडवून ठेवलेला नाही. काही दिवसांपूर्वीच इराणच्या नेत्याने इस्रायलचे अस्तित्व संपविण्याची धमकी दिली होती, याचा दाखला बेनेट यांनी दिला.

दरम्यान, अमेरिका आणि युरोपिय महासंघ इराणविरोधात सर्व पर्याय मोकळे असल्याचे सांगत आहेत. पण यामध्ये लष्करी कारवाईचा समावेश नसल्याचे अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. यामुळे अमेरिकेच्या इराणबाबतच्या भूमिकेवर इस्रायल तसेच अरब देशांमध्ये नाराजी तीव्र होत चालली आहे.

leave a reply