तालिबानने शंभरहून अधिक माजी अफगाणी जवानांची हत्या केली

- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा आरोप

अफगाणी जवानांची हत्याकाबुल – आपल्या राजवटीत सारे काही सुरळीत असल्याचा दावा करणार्‍या तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानच्या दहशतवाद्यांनी शंभरहून अधिक माजी अफगाणी जवानांची हत्या घडविली किंवा त्यांना गायब केले. हा आरोप करून तालिबानच्या राजवटीत कुणीही सुरक्षित नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केला. त्याचवेळी तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या सहा प्रांतातील हजारा आणि उझबेक अल्पसंख्यांकांना राहत्या घरातून बाहेर काढून त्यांच्या घराचा ताबा घेतल्याची माहिती समोर येत आहे.

याआधीच्या सरकारमध्ये पोलीस व लष्करी सेवेत असलेल्या जवानांनी तालिबानच्या सुरक्षा यंत्रणेत सामील व्हावे, अशी घोषणा तालिबानच्या नेत्यांनी काही आठवड्यांपूर्वी केली होती. या माजी जवानांच्या जीवाला धोका नसेल, त्यांना नव्याने कामावर रूजू करून घेतले जाईल, असे आश्‍वासन तालिबानच्या नेत्याने दिले होते. पण तालिबानचे दहशतवादी नेमके याच्या उलट करीत असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनेने आपल्या नव्या अहवालात केला आहे.

तालिबानचे दहशतवादी सरकारी दस्तावेजांचा वापर करून रात्रीअपरात्री माजी जवान तसेच लष्करी अधिकार्‍यांच्या घरावर धाड टाकतात. तालिबानच्या नेत्यांनी या जवानांना सुरक्षेची हमी दिली असली तरी तालिबानचे दहशतवादी जवानांचे अपहरण करून त्यांना ठार करतात. काही घटनांमध्ये अफगाणिस्तानच्या लोकशाहीवादी सरकारसाठी काम करून या जवानांनी सर्वात मोठा व अक्षम्य गुन्हा केल्याचे तालिबानच्या स्थानिक कमांडर्सचे म्हणणे असल्याचा दावा या मानवाधिकार संघटनेने केला.

ऑगस्ट महिन्यापासून आत्तापर्यंतच्या कारवाईत शंभरहून अधिक माजी जवान तालिबान्यांनी ठार केले किंवा त्यांना गायब केले आहे. या कारवायांमुळे अफगाणिस्तानातील माजी सरकारी अधिकारी तसेच पोलीस व लष्करी जवानांना असुरक्षित वाटत आहे. कुणीही जवान तालिबानसमोर शरण येण्याचे धारिष्ट्य करीत नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. अफगाणी जनतेमध्ये तालिबानबाबतची दहशत वाढली आहे.

अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांमध्येही ही दहशत वाढल्याची माहिती अफगाणी माध्यमेच देत आहेत. अफगाणिस्तानच्या कंदहार, बघलान, गझ्नी, दायकुंडी, मैदान आणि जावझान या प्रांतातील हजारा, उझबेक व इतर अल्पसंख्यांकांना तालिबानचे दहशतवादी बेघर करीत आहेत. या अल्पसंख्यांकांच्या घरांचा तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा घेतला असून आपल्याच देशात आमच्यावर अत्याचार होत असल्याचा आक्रोश अल्पसंख्यांक करीत आहेत. हा आक्रोश आंतरराष्ट्रीय समुदाय व माध्यमांपर्यंत पोहोचणार नाही, याची दक्षता तालिबान घेत आहे. यामुळे याची तीव्रता अजूनही आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचलेली नाही. याचा लाभ घेऊन तालिबान आंतरराष्ट्रीय समुदायाने आपल्या राजवटीला अधिकृतता बहाल करावी, अशी मागणी करीत आहे.

leave a reply