चीनने नेपाळच्या सीमेवरील गावाचा ताबा घेतला

बीजिंग – चीनने नेपाळचा भूभाग बळकावण्याचा सपाटा लावला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या गोरखा जिल्ह्यातील रुईला बॉर्डर पोस्ट येथील एक गाव चीनच्या लष्कराने बळकावले आहे. इथल्या गावकऱ्यांना या गावात येण्यास चीनच्या लष्कराने मज्जाव केला असून नेपाळच्या एका वर्तमानपत्राने याची माहिती उघड केली. यामुळे गेल्या महिन्यापर्यंत नेपाळमध्ये असलेले हे गाव आता चीनच्या कब्जात गेल्याचे जगासमोर आले आहे. याआधीही चीनने नेपाळच्या गावांचा ताबा घेतल्याची बाब समोर आली होती. श्रीलंकेप्रमाणे नेपाळ देखील चीनच्या कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून चीन नेपाळचा ताबा घेत असल्याची टीका केली जाते. आर्थिक आघाडीवर नेपाळचा ताबा घेणाऱ्या चीनने लष्करी आघाडीवरही आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. नेपाळच्या सीमेवरील लष्करी चौक्या आणि त्याच्याही पुढे येऊन नेपाळच्या सीमेमधील गावांचा ताबा घेण्याचा सपाटा चीनने लावला आहे.

China-Nepal-landनेपाळच्या गोरखा जिल्ह्यातील चुमानूब्री गावातील स्थानिकांनी चीनच्या या कारवायांची माहिती उघड केली. येथील रुईला गावात चीनने 200 मीटर लांबीचे काटेरी कुंपण टाकले आहे. यामुळे एका रात्रीत येथील 190 कुटुंबे आता नेपाळ नाही तर चीनचे नागरिक बनले आहेत. या ठिकाणी चीनने आपले जवान तैनात केले असून ते स्थानिकांनाच रोखत आहेत. एरवी कुठल्याही आडकाठीशिवाय एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नेपाळच्या नागरिकांना चिनी लष्कराच्या या दडपशाहीमुळे आपल्याच देशात, आपल्याच गावात वावरणे अवघड बनले आहे.

याआधीही चीनने नेपाळच्या सीमारेषेत घुसखोरी करून येथील प्रशासकीय इमारतीचा ताबा घेतल्याची घटना घडली होती. सदर प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजल्यानंतर या भागातून चीनला आपल्या जवानांना माघारी घ्यावे लागले होते. मात्र यानंतरही चीनच्या नेपाळच्या सीमेजवळील लष्करी हालचाली सुरू असल्याचा दावा केला जातो. गेल्या महिन्यात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने नेपाळजवळील तिबेटच्या भागात मोठ्या प्रमाणात युद्धसरावाचे आयोजन केले होते. तसेच चीनने या भागात लष्कराची अतिरिक्त तैनाती सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. नेपाळच्या सीमेजवळील चीनच्या या हालचाली म्हणजे व्यापक कटाचा भाग आहे.

जवळपास सर्वच शेजारी देशांबरोबर चीनचे सीमावाद सुरू असून अलिकडच्या काळात या वादात चीन आक्रमक भूमिका स्वीकारताना दिसत आहे. शेजारी देशांना आपल्या लष्करी बळाचा धाक दाखवून चीनने घुसखोरीचे तंत्र अवलंबलेआहे. नेपाळसारख्या अत्यंत छोट्या देशाकडून आपल्याला फारसा प्रतिकार होणार नाही, असा समज चीनने करून घेतला आहे. त्यातच सत्तेवर आल्यापासून चीनच्या विरोधात भूमिका स्वीकारणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधान शेरबहाद्दूर देवबा यांच्या सरकारवर दडपण टाकण्याचा चीनचा डाव असण्याची दाट शक्यता समोर येत आहे.

leave a reply