जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार जवानांना वीरमरण

- चकमकीत तीन दहशतवादी ठार

श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात हिमवृष्टीपूर्वी घुसखोरी करण्याचा कट पाकिस्तानकडून आखण्यात आला असून रविवारी असाच घुसखोरीचा मोठा प्रयत्न सुरक्षादलांनी उधळून लावला. यावेळी उडालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले. यादरम्यान दहशतवाद्यांना सहाय्य करण्यासाठी सीमेपलीकडून पाकिस्तानच्या जवानांचा गोळीबारही सुरु होता, अशी माहिती सुरक्षादलांच्या अधिकाऱ्याने दिली. घुसखोरी करणारे तीन दहशतवादी चकमकीत ठार झाले आहेत.

जम्मू -काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये रात्री १ च्या सुमारास सीमेवर बीएसएफच्या जवानांना संशयीत हालचाली दृष्टीस पडल्या. बीएसएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुद गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही वेळातच जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले. पण या चकमकीत हवालदार सुदीप सरकार जखमी झाले होते. मात्र या परिस्थितीतही दहशतवाद्यांशी लढत राहिले. गंभीर जखमी झालेल्या हवालदार सुदीप यांना वीरमरण आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवादी आणि बीएसएफच्या जवानांमध्ये चकमक उडाली त्याचवेळी दहशतवाद्यांना सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यास सुरुवात करण्यात आली होती. या चकमकीची माहिती मिळताच जवळच्या फॉरवर्ड पोस्टवरुन लष्कराच्या जवानांची अतिरिक्त कुमक मदतीसाठी पाठविण्यात आली. त्यानंतर काही काळ चकमक थांबली होती. दहशतवादी येथून निसटू नयेत म्हणून या भागाला वेढा देण्यात आला होता. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी चकमकीस पुन्हा सुरुवात झाली.

या चकमकीत आणखी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. मात्र चकमकीदरम्यान गंभीर जखमी झालेल्या लष्कराच्या एका कॅप्टनसह आणखी दोन जवान नंतर शहीद झाल्याची माहिती लष्कराचे पीआरओ कर्नल राजेश कालिया यांनी दिली. गेल्या काही महिन्यात ऑपरेशन दरम्यान झालेली ही लष्कराची मोठी जीवितहानी असल्याचे सांगितले जाते. सीमेपलीकडे २०० ते २५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचे अहवाल वारंवार येत आहेत. मात्र सतर्क भारतीय सैनिकांमुळे घुसखोरीची प्रयत्न उधळले जात आहेत.

दरवर्षी हिवाळ्यात हिमवृष्टी सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानकडून असे घुसखोरीची प्रयत्न केले जातात. कारण बर्फवृष्टीनंतर दहशतवाद्यांचे घुखोरीचे मार्ग बंद होतात. त्यामुळे जास्तीत जास्त घुसखोरी प्रयत्न या काळात होतात. लवकरच बर्फवृष्टी सुरु होणार असून त्यापूर्वी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसविण्यासाठी पाकिस्तान जोरदार प्रयत्न करीत आहे. शनिवारी रात्री झालेला घुसखोरीचा प्रयत्न पाकिस्तानच्या या कटाचा भाग होता असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्यावर्षी जम्मू-कश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानला मोठी दहशतवादी कारवाई घडविता आलेली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांच्या जोरदार कारवाईने दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर हिंसक कारवाया करण्यासाठी हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे मार्ग बंद होण्याआधी मोठी घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तान धडपडत आहे.

गेल्याच आठवड्यात पाकिस्तानातून भारतीय सीमेत उघडणारे १७० मीटर लांबीचे घुसखोरीसाठी तयार करण्यात आलेले एक भुयार बीसएफला आर.एस.पुरा सेक्टरमध्ये आढळले होते. तसेच ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक दहशतवादी घटना काश्मीर खोऱ्यात घडल्या आहेत. मात्र यामध्ये जीवितहानी झालेली नाही.

leave a reply