चीन ‘वेदर मॉडिफिकेशन’ योजनेचा विस्तार करणार

‘वेदर मॉडिफिकेशन’

बीजिंग – चीनने ‘वेदर मॉडिफिकेशन प्रोग्राम’ अर्थात हवामानात कृत्रिमरित्या बदल घडविण्याची योजना विस्तारित करणार असल्याची लक्षवेधी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत चीन 55 लाख चौरस किलोमीटरच्या भागात कृत्रिम पाऊस किंवा हिमवर्षाव करणार आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या दीडपट अधिक भूभागावर चीन हा प्रयोग करणार आहे. त्यामुळे चीनचा हा ‘वेदर मॉडिफिकेशन’ भारतासह चीनच्या इतर स्पर्धक देशांसाठीही धोक्याचा इशारा असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. किंबहुना आपल्या विरोधात जाणाऱ्या देशांना इशारा देण्यासाठी चीनने ही घोषणा केल्याची दाट शक्यता समोर येत आहे.

चीनच्या ‘स्टेट काऊन्सिल’ने या आठवड्यात मोठी घोषणा केली. गेले दशकभर चीन प्रयोग करीत असलेला ‘वेदर मॉडिफिकेशन प्रोग्राम’ पुढच्या टप्प्यात नेत असल्याचे ‘स्टेट काऊन्सिल’ने जाहीर केले. 2025 सालापर्यंत आपला हा कार्यक्रम पूर्णपणे विकसित झालेला असेल, असा दावा चीनने केला. या पाच वर्षांच्या कालावधीत चीन 55 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात कृत्रिम पाऊस किंवा हिमवर्षाव करणार आहे. त्याचबरोबर 5,80,000 चौरस किलोमीटर क्षेत्रात गारांचा पाऊस पाडला जाईल, असे चीनच्या ‘स्टेट काऊन्सिल’ने म्हटले आहे. यामुळे कृषी उत्पादन वाढविता येणे शक्य आहे. तसेच वणवा शमविण्यासाठी याचा वापर होईल. उच्च तापमान किंवा दुष्काळी परिस्थितीवर देखील मात करता येईल, असा दावा चीन करीत आहे. यासाठी चीनच्या मुखपत्राने दिलेल्या बातमीचा दाखला दिला जातो. गेल्या वर्षी या ‘वेदर मॉडिफिकेशन’मुळे झिंजियांग प्रांतातील शेत जमिनीवर कोसळणारा गारांचा पाऊस 70 टक्के रोखण्यात यश मिळाल्याचा दावा चीन करीत आहे.

‘वेदर मॉडिफिकेशन’गेल्या दशकभराहून अधिक काळ चीन ‘वेदर मॉडिफिकेशन प्रोग्राम’संबंधी वेगवेगळे प्रयोग करीत आहे. 2008 सालच्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये धुके आणि नैसर्गिक पाऊस टाळण्यासाठी चीनने ‘क्लाऊड सिडिंग’चा वापर केला होता. गेले दशकभर चीन या ‘क्लाऊड सिडिंग’चा वापर करीत आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या संशोधकांनी सॅटेलाईट्स आणि रॉकेट्सचा वापर करून कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावाही केला होता. त्याचबरोबर यांग्त्झे नदीवरील अतिरिक्त बाष्प चीनच्या दुष्काळग्रस्त भागात वळविल्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती.

चीनचे ‘वेदर मॉडिफिकेशन’ संबंधी तंत्रज्ञान मान्सूनवर अवलंबून असलेल्या कृषीप्रधान भारतासाठी धोक्याचा इशारा असल्याचा दावा केला जातो. चीनने या वेदर मॉडिफिकेशनचा वापर आपल्या देशापर्यंत मर्यादित ठेवण्याचे जाहीर केले आहे. मात्र आपल्या आर्थिक व लष्करी बळाचा परराष्ट्र धोरणासाठी आक्रमकपणे वापर करण्यासाठी कुख्यात असलेला चीन आपल्या ‘वेदर मॉडिफिकेशन’च्या तंत्रज्ञानाचा भारताविरोधात वापर करण्याची शक्यता कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे भारतासाठी ही बाब इशाराघंटा ठरत आहे.

वेदर मॉडिफिकेशन अर्थात हवामानात बदल घडवून आणण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून इतर देशांमध्ये अतिवृष्टी, महापूर, भूकंप यासारख्या आपत्ती निर्माण केल्या जाऊ शकतात, असा आरोप याआधी झाला होता. आपल्या विरोधात गेलेल्या देशांना धडा कविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, असे ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’चे म्हणणे आहे. त्यामुळे चीनकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून चीन ब्रह्मपुत्रा नदीवर धरण उभारण्याची घोषणा करून भारतावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ‘वेदर मॉडिफिकेनश’बाबत चीनने केलेली ही घोषणा देखील या देशाच्या दबावतंत्राचा भाग असण्याची दाट शक्यता आहे.

leave a reply