अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर इराणचा इराकमधील प्रभाव वाढेल

- इराकच्या नेत्यांची चिंता

सैन्यमाघारबगदाद – इराकमधील 2,500 सैनिकांच्या माघारीवर अमेरिका ठाम असून येत्या काही दिवसात ही माघार सुरू होणार असल्याची घोषणा पेंटॅगॉनने केली आहे. पण अमेरिकेची ही सैन्यमाघार इराणसाठी हितावह ठरणार असून इराण इराकमध्ये अधिक बळकट होईल. याचा परिणाम क्षेत्रीय सुरक्षा आणि राजकीय स्थैर्यावर होईल, अशी चिंता इराकमधील नेते व्यक्त करीत आहेत. दरम्यान, इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या हल्ल्याची शक्यता बळावल्याने अमेरिकेने इराकमधील आपल्या दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.

या वर्षाच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेने इराकच्या बगदाद विमानतळावर चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी यांना ठार केले होते. सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराणमधील इराकसंलग्न दहशतवादी गट बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ले चढवू शकतात. तसेच अमेरिकी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करू शकतात, असे इशारे अमेरिकी तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमे अमेरिकी व इराकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने देत आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिकेने इराकमधील आपल्या सैन्यमाघारीची घोषणा केली आहे.

सैन्यमाघार

सध्या इराकमध्ये अमेरिकेचे 3,000 सैनिक तैनात असून यापैकी 2,500 सैनिक पुढच्या काही दिवसात मायदेशी येतील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले. तर 15 जानेवारी 2021 च्या आधी अमेरिकी सैनिक माघारी येतील, असा विश्‍वास अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला होता.

अमेरिकी सैनिकांच्या माघारीने इराकच्या सुरक्षेवर तितकासा परिणाम होणार नसल्याचा दावा इराकचे लष्करी अधिकारी करीत आहेत. पण अमेरिकेच्या या सैन्यमाघारीमुळे इराकमधील सुन्नी व कुर्द नेते चिंतेत पडले आहेत. अमेरिकेची ही माघार इराकसह या क्षेत्रातील सुरक्षेवर परिणाम करणारी होईल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

सैन्यमाघार

इराकमध्ये तैनात अमेरिकी सैनिकांकडे नाटो सदस्य देशांच्या तुलनेत अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज असलेली सुरक्षा यंत्रणा, शस्त्रास्त्रे, थर्मल कॅमेरा, ड्रोन्स, सॅटेलाईट फोटोग्राफ्स असे बरेच काही आहे. यामुळे ‘आयएस’ व इतर दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यास, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यास सहाय्य मिळते, अशी प्रतिक्रिया इराकच्या निनेव्ह प्रांताचे उपप्रमुख मोहम्मद नूरी अब्द-रब्बू यांनी दिली. पण अमेरिकेच्या माघारीनंतर इराकमधील ‘आयएस’च्या दहशतवाद्यांवरील कारवाईवर परिणाम होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर त्यांची जागा आधीपासूनच इराकमध्ये तैनात असलेले इराणचे लष्कर किंवा इराणसंलग्न दहशतवादी गट घेतील, अशी चिंता रब्बू यांनी व्यक्त केली. याआधीच इराणचे लष्कर व इराणसंलग्न गटांनी इराकच्या निनेव्ह, अन्बर आणि सलाह अल-दिन या प्रांतातील मोठा भूभाग आपल्या नियंत्रणात ठेवला आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेची इराकमधील जागा इराण घेईल, असा इशारा रब्बू यांनी दिला.

अमेरिकेतील आघाडीची वर्तमानपत्रे तसेच वृत्तवाहिन्या देखील ट्रम्प यांच्या इराकमधील माघारीच्या निर्णयावर टीका करू लागली आहेत. या माघारीमुळे इराणचा इराकमधील प्रभाव भयावहरित्या वाढेल तसेच ‘आयएस’च्या दहशतवाद्यांपासून असलेला धोका अधिक वाढेल, असा इशारा ही वर्तमानपत्रे देत आहेत.

leave a reply