तिबेटींवर अत्याचार करणाऱ्या चीनच्या विरोधात अमेरिकेच्या धर्तीवर कायदे करा

- अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे लोकशाहीवादी देशांना आवाहन

वॉशिंग्टन – चीनचे राजनैतिक अधिकारी दुसऱ्या देशांमध्ये मुक्तपणे संचार करू शकतात. तोच अधिकार चीन इतर देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना कसा काय नाकारू शकतो? असा सवाल करून अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी चीनने तिबेटमध्ये अमेरिका व इतर देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना प्रवेश द्यायलाच हवा, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी तिबेटमधील बौद्धधर्मिय, झिंजियांगमधील इस्लामधर्मिय आणि चीनमधील ख्रिस्तधर्मियांना या देशात अत्याचार सहन करावे लागत असल्याची घणाघाती टीका अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी केली आहे. अशा चीनला रोखण्यासाठी अमेरिकेच्या धर्तीवर इतर देशांनीही कायदे करावे, असे आवाहन या राजनैतिक अधिकाऱ्यांनी केले आहे.

अत्याचार

अमेरिकेने तिबेटसाठी नियुक्त केलेले विशेष राजनैतिक अधिकारी रॉबर्ट ए. डेस्ट्रो यांनी एका व्हर्चुअल कार्यक्रमात चीनच्या तिबेटवरील अत्याचारांचा पाढा वाचला. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना तिबेटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात कायदा संमत करून चीनला दणका दिला होता. अमेरिकन अधिकाऱ्यांना तिबेटमध्ये प्रवेश नाकारणाऱ्या चीनच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करून त्यांना अमेरिकेत प्रवेश नकारणारा हा कायदा करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनला चपराक लगावली होती.

इतर लोकशाहीवादी मित्रदेशांनीही अमेरिकेचे अनुकरण करून चीनला रोखण्यासाठी असे कायदे करावे, अशी मागणी डेस्ट्रो यांनी केली. चीन आपल्या देशातील धार्मिक अल्पसंख्यांकांची गळचेपी करीत आहे. तिबेटी भाषा, संस्कृती यांचा संहार करण्याचे भयंकर धोरण चीन राबवित आहे. इतकेच नाही तर तिबेटी बौद्धधर्मियांचे प्रमुख असलेल्या दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकारही चीनला हवा आहे. तिबेटची वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक संस्कृती आपल्या कम्युनिस्ट पक्षाच्या चौकटीत बांधून ती नष्ट करण्यासाठी चीन आक्रमक पावले उचलत आहे, अशी घणाघाती टीका डेस्ट्रो यांनी केली.

चीनची ही दडपशाही केवळ तिबेटींवरच केली जात नाही, तर इतर समुदाय देखील चीनच्या या अन्यायकारक धोरणाचे बळी ठरत असल्याचा आरोप डेस्ट्रो यांनी केला. उघूरवंशिय इस्लामधर्मियांवर चीन अनन्वित अत्याचार करीत आहे. या समुदायाला धार्मिक स्वातंत्र्य नाकारले जात आहे. तसेच चीनमधील ख्रिस्तधर्मियांनाही अन्याय सहन करावा लागत आहे. कारण चीन आपल्याला अनुकूल असलेली धोरण ख्रिस्तधर्मियांच्या चर्चवर लादत आहे, असा ठपका डेस्ट्रो यांनी ठेवला.

चीनवर राज्य करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षापेक्षा दुसऱ्या कुणावरही ठेवलेली श्रद्धा आपल्यासाठी घातक असल्याचे चीनच्या राजवटीला वाटत आहे. त्यामुळेच धर्मश्रद्धेवर चीन आघात करीत सुटला आहे, अशी आरोपांची फैर रॉबर्ट ए. डेस्ट्रो यांनी झाडली. त्याचवेळी इतर लोकशाहीवादी देशांनी या आघाडीवर एकजूट करून चीनला रोखण्याची आवश्‍यकताही डेस्ट्रो यांनी हिरिरीने मांडली. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला विरोध करणाऱ्यांची तसेच कोरोनाव्हायरसबाबत चीनने दडविलेली माहिती उघड करणाऱ्यांची चीनमध्ये भयंकर अवस्था झाली होती, याचीही आठवण डेस्ट्रो यांनी करून दिली.

गेल्या काही महिन्यांपासून तिबेटबाबतच्या चीनच्या धोरणांवर अमेरिकेने कठोर प्रहार केले आहेत. तिबेट आणि तैवान यावर अतिशय संवेदनशीलता दाखविणारा चीन यामुळे अधिकाधिक असुरक्षित बनत चालला आहे. मुख्य म्हणजे तिबेटचा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित होऊ नये, यासाठी चीन आक्रमक डावपेचांचा वापर करीत आहे. मात्र तिबेटी बौद्धधर्मियांचे प्रमुख नेते असलेल्या दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याबाबत चीन दाखवित असलेली आक्रमकता आंतरराष्ट्रीय टीकेचा विषय बनली आहे.

या विरोधात जगभरातील तिबेटींनी आवाज उठविला आहे. त्याचवेळी तिबेटमधूनही चीनच्या दडपशाहीविरोधात हालचाली होत आहे. मात्र इथल्या बातम्या जगासमोर येऊ नये, यासाठी चीन आपली सारी शक्ती अमानुषपणे वापरत असल्याने, इथल्या चीनच्या अत्याचाराच्या बातम्या उघड होऊ शकलेल्या नाहीत.

leave a reply