कोरोनाची साथ पसरविणार्‍या चीनने अमेरिका व जगाला दहा ट्रिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई द्यावी – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी

वॉशिंग्टन – ‘‘वुहानमधून पसरलेल्या ‘चायना व्हायरस’बाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प खरे बोलत होते, हे आता तथाकथित शत्रू देखील मान्य करू लागले आहेत. ही भयंकर साथ पसरविणार्‍या चीनने आता अमेरिका व जगाला यासाठी सुमारे दहा ट्रिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई द्यावी’’, अशी मागणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार डॉ. फॉसी व चीनच्या वुहान प्रयोगशाळेमध्ये झालेल्या ईमेलच्या देवाणघेवाणीतून दुर्लक्ष न करता येण्याजोगी माहिती समोर आलेली आहे. त्यातून कोरोनाच्या साथीबाबतचे सत्य बाहेर आले आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

नुकसानभरपाईडोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर असतानाच, अमेरिकेत कोरोनाची साथ धडकली होती. कोरोनाच्या फैलावामुळे अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. अशा काळात ट्रम्प यांनी कोरोनाच्या विषाणूचा उल्लेख ‘चायनीज व्हायरस’ असाच केला होता. ही साथ चीननेच पसरविली आहे, हे वारंवार जगजाहीर करण्यासाठी ट्रम्प हा उल्लेख सातत्याने चायनीज व्हायरस असाच करीत राहिले. अमेरिकी माध्यमांनीच ट्रम्प यांच्यावर टीका करून त्यांचा हा दावा अमान्य केला. आपले अपयश झाकण्यासाठी ट्रम्प चीनवर दोषारोप करीत असल्याचे अमेरिकी माध्यमांचा गट सातत्याने सांगत होता.

पण आता उदारमतवादी व ट्रम्प यांचे कट्टर विरोधक असलेल्या या पत्रकारांनी ट्रम्प यांचा कोरोनाबाबतचा दावा धुडकावून आपण चूक केल्याची कबुली दिली. केवळ ट्रम्प आरोप करीत आहेत, म्हणून आम्ही त्याला विरोध केला, असे या पत्रकारांचे म्हणणे आहे. त्याचा दाखला देऊन आपले तथाकथित शत्रू देखील कोरोनाची साथ चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच पसरविण्यात आल्याचे मान्य करू लागले आहेत, असे ट्रम्प म्हणाले. कोरोनाने अमेरिकेत सहा लाखाहून अधिकजणांचे बळी घेतले असून अजूनही या देशावरील कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. अमेरिका आणि जगामध्ये 35 लाखाहून अधिकजणांचे बळी घेऊन विध्वंस माजविणार्‍या या साथीसाठी चीनने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ट्रम्प यांनी केली.

ही नुकसानभरपाई तब्बल दहा ट्रिलियन डॉलर्स अर्थात दहा लाख कोटी डॉलर्स इतकी असावी, असे ट्रम्प पुढे म्हणाले. त्याचवेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे आरोग्यविषयक सल्लागार डॉ. फॉसी यांच्यावर ट्रम्प यांनी सडकून टीका केली. कोरोनाची साथ आल्यानंतर आपण अमेरिकेच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला. पण त्याला डॉ. फॉसी यांनी विरोध केला होता. सुदैवाने मी फॉसी यांच्या विरोधाची पर्वा न करता हा निर्णय घेऊन लाखोजणांचे प्राण वाचविले. सीमा बंद करणे, कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणे आणि मास्क वापरण्याची आग्रह धरून आपण कोरोनाचा फैलाव शक्य तितक्या प्रमाणात रोखला होता. पण या निर्णयासाठी आपल्याला वंशद्वेषी ठरवून टीका केली होती, याची आठवण ट्रम्प यांनी करून दिली. पण आता हे सारे अमेरिकन जनतेचा जीव वाचविणारे निर्णय होते, हे सिद्ध झालेले आहे, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले.

leave a reply