रशियाप्रमाणे चीन ‘डूम्स डे’ ड्रोनची निर्मिती करणार

बीजिंग – सुमारे 300 मीटर उंच त्सुनामीची लाट निर्माण करून संपूर्ण शहर नष्ट करण्याची क्षमता असलेले ‘पोसायडन’ ड्रोन रशियाच्या नौदलात सामील झाले आहे. याला ‘डूम्स डे’ अर्थात प्रलय घडवून आणणारे असे नाव देऊन माध्यमांनी या ड्रोनमार्फत होणाऱ्या संहाराची जाणीव करून दिली होती. आत्ता चीन देखील रशियाप्रमाणे ‘डूम्स डे’ ड्रोनची निर्मिती करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पॅसिफिक महासागरात या ड्रोन्सची तैनाती केली जाऊ शकते, असे चिनी संशोधकांचे म्हणणे आहे. आम्ही विकसित करीत असलेले आण्विक ड्रोन टॉर्पेडो रशियापेक्षाही प्रगत असल्याचा दावा चीन करीत आहे.

चीनमधील संशोधकांच्या पथकाने पाणबुडीमध्ये बसविल्या जाणाऱ्या अणुभट्टीचे आरेखन पूर्ण केल्याचा दावा केला आहे. आकाराने लहान, कमी खार्चिक असलेल्या या अणुभट्टीच्या सहाय्याने टॉर्पेडोचे स्वार्म पॅसिफिक महासागरात सोडता येऊ शकतात. ‘चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री कॉर्पोरेशन’ या जर्नलमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध झाली आहे. तर चीनचे संशोधक रशियन ड्रोन ‘पोसायडन’ची छोटी आवृत्ती तयार करीत असल्याचा दावा हाँगकाँगस्थित एका दैनिकाने केला.

‘पोसायडन’ हे अणुऊर्जेवर चालणारे ड्रोन टॉर्पेडो आहे. ‘पोसायडन’ ड्रोन वाहून नेणारी रशियाची बोल्गोरॉड ही अजस्त्र पाणबुडी काही दिवसांपूर्वीच रशियन नौदलात सामील झाली होती. सध्या रशियाच्याच ताफ्यात असलेली टायफून श्रेणीतील पाणबुडी ही जगातील सर्वात मोठ्या आकाराची पाणबुडी मानली जाते. पण सुमारे 184 मीटर लांबीची बोल्गोरोड ही जगातील सुपरसाईज्‌‍ पाणबुडी ठरली होती. बोल्गोरॉड पाणबुडी सहा पोसायडन ड्रोन वाहून नेण्याची क्षमता ठेवून आहे.

बोल्गोरॉड पाणबुडी व पोसायडन ड्रोनचा आकार हा गेली काही वर्षे पाश्चिमात्य देशांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. साधारण एक हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकणारे डूम्स डे ड्रोन मेगाटन वजनाची आण्विक स्फोटके वाहून नेऊ शकते. त्यामुळे एकाच क्षणात युद्धाचे पारडे फिरविण्याची क्षमता या डूम्स डे ड्रोनमध्ये असल्याचे रशियन सरकारचे म्हणणे आहे. स्वयंचलित असणारे हे ड्रोन उत्तर अटलांटिक क्षेत्र सहज पार करू शकते. या ड्रोनच्या सहाय्याने सुमारे तीनशे फूट उंचीची त्सुनामी निर्माण करून एका मोठ्या शहराला जलसमाधी देता येऊ शकते, असा दावा केला जातो.

अमेरिकेच्या क्षेपणास्त्र यंत्रणेला गुंगारा देऊन अमेरिकेच्या किनारपट्टीला लक्ष्य करण्यासाठी रशियाने हे ड्रोन तयार केल्याचे अमेरिकेतील लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. रशियाचे हे ड्रोन ‘गेम चेंजर’ असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याच पोसायडन ड्रोनच्या धर्तीवर चीन देखील छोटे पोसायडन ड्रोन तयार करीत आहे. पण आपले हे ड्रोन टॉर्पेडो सामान्य आकाराच्या पाणबुडीतूनही प्रक्षेपित करता येतील, असा दावा चिनी संशोधकांनी केला आहे. यामुळे पाणबुडीतून पॅसिफिक महासागरात टॉर्पेडो स्वार्मचा हल्ला चढवता येऊ शकतो, असा इशारा चिनी संशोधक देत आहेत.

दरम्यान, रशियाचे पोसायडन ड्रोन याआधीच अमेरिका व नाटोसाठी आव्हान ठरत आहे. अशा परिस्थितीत, चीनदेखील रशियाप्रमाणे पोसायडन ड्रोनची निर्मिती करून अमेरिका व नाटोच्या आव्हानात भर टाकत असल्याचे दिसत आहे.

leave a reply