अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याआधी इस्रायलची इराणविरोधात मोर्चेबांधणी

- इस्रायलची युएई, बाहरिन, इजिप्त व मोरोक्कोशी सहकार्य वाढविण्याची घोषणा

मोर्चेबांधणीमनामा – इस्रायल व युएई, बाहरिन, इजिप्त आणि मोरोक्को या अरब देशांनी क्षेत्रिय सहकार्य वाढविण्याची घोषणा केली. आर्थिक, व्यापारी क्षेत्राबरोबरच सुरक्षेच्या आघाडीवरही सहकार्य प्रस्थापित करून ते वृद्धिंगत करण्यावर इस्रायल व अरब देशांचे एकमत झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आखातात दाखल होण्याआधी झालेली ही घोषणा लक्षवेधी ठरते. दरम्यान, इस्रायल व अरब देशांमधील सहकार्य आपल्या विरोधात असल्याचा आरोप इराण करीत आहे.

तीन महिन्यांपूर्वी इस्रायलमध्ये अरब देशांची ‘नेगेव्ह परिषद’ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इस्रायलसह युएई, बाहरिन, इजिप्त, मोरोक्को तसेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री उपस्थित होते. अब्राहम करार केलेल्या इस्रायल आणि सहकारी अरब देशांना पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आणणारी ही परिषद ऐतिहासिक ठरली होती. या बैठकीत इस्रायल व अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला रोखण्यासाठी नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा केली होती. तसेच अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव कमी होत असताना, आर्थिक आघाडीवरही एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे या परिषदेत अधोरेखित करण्यात आले होते.

सोमवारी बाहरिनची राजधानी मनामा येथे ‘नेगेव्ह परिषदे’त सहभागी झालेल्या देशांच्या प्रतिनिधी मंडळाची विशेष बैठक पार पडली. ‘आम्ही नेगेव्ह परिषदेत झालेल्या सहमतीच्या आधारावर नवी प्रादेशिक आघाडी उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत’, अशी घोषणा मनामा येथील बैठकीनंतर करण्यात आली. संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अन्न व पाण्याची सुरक्षा अशा सहा मुद्यांवर सहकार्य वाढविण्यावर या बैठकीत एकमत झाले. अमेरिकेच्या प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होत्या.

गेल्या काही दिवसांपासून आखातातील घडामोडींनी वेग धरलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आखाती दौऱ्यावर येणार असल्याचे व्हाईट हाऊसने जाहीर केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्रायल व सौदीला भेट देणार आहेत. यावेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणबरोबर कतार येथे नव्याने सुरू झालेल्या वाटाघाटींसाठी इस्रायल व सौदीचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करतील, असा दावा इस्रायली माध्यमे करू लागली आहेत.

या पार्श्वभूमीवर, गेल्या आठवड्याभरात इस्रायल व अरब देशांनी सुरू केलेल्या हालचाली महत्त्वाच्या ठरतात. गेल्याच आठवड्यात सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इजिप्त, जॉर्डन तसेच तुर्की या देशांचा दौरा केला होता. सौदीच्या क्राऊन प्रिन्सनीही अरब मित्रदेशांबरोबर सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते. तर नेगेव्ह परिषदेतील सदस्य देशांची बाहरिनमध्ये पार पडलेल्या बैठकीतही इस्रायल व अरब देशांनी सहकार्य वाढविण्यावर भर दिला, याकडे इस्रायली वृत्तवाहिन्या लक्ष वेधत आहेत. अमेरिका इराणबरोबर अणुकरारासाठी प्रयत्न करीत असताना, त्याविरोधात इस्रायल व सौदी अरेबियाने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

leave a reply