बायडेन प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी चीन उत्तर कोरियाचा वापर करील

- अमेरिकी विश्‍लेषकाचा दावा

बायडेन प्रशासनावर दबाववॉशिंग्टन/प्योनग्यँग – सोमवारी बीजिंगमध्ये चीन व उत्तर कोरियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांच्यात महत्त्वपूर्ण संदेशांची देवाणघेवाण झाल्याचे वृत्त चिनी माध्यमांनी दिले आहे. दोन्ही देशांमधील पारंपारिक आघाडी अधिक भक्कम असल्याचे निवेदन या चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आले. चीन व उत्तर कोरियामधील चर्चा आणि हे निवेदन म्हणजे, बायडेन प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी चीनकडून उत्तर कोरियाचा वापर होण्याचे संकेत आहेत, असा दावा अमेरिकी विश्‍लेषकाने केला.

गेल्या आठवड्यात अमेरिका व दक्षिण कोरियात ‘टू प्लस टू’ स्तरावरील बैठक पार पडली होती. या बैठकीत दोन्ही देशांनी उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त करणे हे प्रमुख उद्दिष्ट राहिल, असे जाहीर केले होते. यावेळी अमेरिकेने चीनलाही या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. ‘चीन व उत्तर कोरियामध्ये असलेल्या विशेष संबंधांचा वापर करून चीनने त्या देशावर दडपण टाकावे. ही बाब चीनच्या हितसंबंधांच्या दृष्टीनेही योग्य ठरेल’, असा सल्ला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला होता. त्यानंतर अमेरिका व चीनमध्ये झालेल्या बैठकीत दोन देशांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे वृत्त उघड झाले होते.

या पार्श्‍वभूमीवर, सोमवारी चीन व उत्तर कोरियामध्ये झालेली उच्चस्तरीय बैठक लक्ष वेधून घेणारी ठरते. चीनचे वरिष्ठ अधिकारी सॉंग ताओ व उत्तर कोरियाचे चीनमधील राजदूत री र्‍योंग नाम यांच्यात यावेळी चर्चा झाली. चर्चेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व उत्तर कोरियाच्या किम जॉंग उन यांच्यात संदेशांची देवाणघेवाण झाल्याचे वृत्त चिनी माध्यमांनी दिले आहे. जिनपिंग यांनी द्विपक्षीय संबंध अत्यंत मौल्यवान असल्याचे सांगून कोरियन क्षेत्रातील स्थैर्यासाठी योगदान देण्याची ग्वाही दिली. तर किम जॉंग उन यांनी चीनबरोबरील एकजूट व सहकार्य अधिक भक्कम झाल्याचा दावा केला.

चीन व उत्तर कोरियामधील संदेशांची देवाणघेवाण हा अमेरिकेच्या बायडेन प्रशासनासाठी ‘वॉर्निंग शॉट’ असल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे. चीन बायडेन प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी उत्तर कोरियाचा कार्ड म्हणून वापर करेल, असे हॅरी कॅझिऍनिस या विश्‍लेषकांनी बजावले. चीनला रोखण्यासाठी बायडेन काहीही करु शकत नाहीत, हे दाखविण्यासाठी चीन याचा उपयोग करु शकतो, याकडेही कॅझिऍनिस यांनी लक्ष वेधले.

उत्तर कोरियाच्या राजवटीवर सर्वाधिक प्रभाव असणारा देश म्हणून चीन ओळखला जातो. उत्तर कोरियाकडे असलेल्या अण्वस्त्रांमागील तंत्रज्ञान व इतर सहाय्यही चीननेच पुरविल्याचे मानले जाते. अर्थसहाय्य, अन्नधान्याचा पुरवठा यासह अनेक मार्गांनी चीन उत्तर कोरियावरील आपला प्रभाव टिकवून आहे.

leave a reply