बायडेन यांच्या वक्तव्यानंतर तैवान क्षेत्रात युद्धसराव करून चीनचा अमेरिकेला इशारा

तैवान क्षेत्रातबीजिंग/वॉशिंग्टन – तैवानच्या रक्षणासाठी लष्करी तैनातीचे संकेत देणाऱ्या अमेरिकेला चीनने नवा इशारा दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या वक्तव्यानंतर 24 तासांच्या अवधीत चीनने तैवान क्षेत्रात व्यापक युद्धसरावाचे आयोजन केले आहे. या सरावात युद्धनौका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, बॉम्बर्स यांचा समावेश आहे. सराव आयोजित करतानाच चीनच्या दृष्टिने तैवानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा हा ‘डेड एन्ड’ असल्याचा इशाराही लष्करी प्रवक्त्यांनी दिला. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका तैवानबरोबरील शस्त्रसहाय्याचे धोरण बदलण्याची तयारी करीत असल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने केला आहे.

काही दिवसांपूर्वी जपान दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तैवानच्या संरक्षणाबाबत वक्तव्य केले होते. चीनच्या हल्ल्याविरोधात अमेरिका तैवानच्या सुरक्षेची काळजी घेईल, असे बायडेन म्हणाले होते. बायडेन यांच्या वक्तव्यावर चीनच्या परराष्ट्र विभागाने तीव्र निषेध नोंदविला होता. मात्र यावर न थांबता चीनच्या संरक्षण विभागाने व्यापक युद्धसराव आयोजित करून अमेरिकेला इशारा दिला आहे. चीनच्या ‘ईस्टर्न थिएटर कमांड’ने याची माहिती दिली.

तैवान क्षेत्रातचीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या विविध विभागांनी तैवान व नजिकच्या क्षेत्रात ‘रिअलॅस्टिक कॉम्बॅट एक्सरसाईज’ केल्याची माहिती कमांडचे प्रवक्ते कर्नल शि यी यांनी दिली. यात चीनचे नौदल, हवाईदल, व रॉकेट फोर्सेस सहभागी झाल्या होत्या, असे ‘ईस्टर्न थिएटर कमांड’कडून सांगण्यात आले. ‘ईस्टर्न थिएटर कमांड’ने या महिन्यात तैवान क्षेत्रात आयोजित केलेला हा दुसरा मोठा युद्धसराव ठरतो. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चीनने लिओनिंग विमानवाहू युद्धनौकेसह ‘कॅरिअर ग्रुप’ व बॉम्बर्सच्या सहाय्याने तैवान क्षेत्रात सराव केला होता.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याप्रमाणे येत्या काळात चीनदेखील तैवानवर कारवाई करील, असा इशारा आंतरराष्ट्रीय नेते, विश्लेषक देत आहेत. तैवानची तुलना युक्रेनशी करता येणार नसल्याचे सांगून चीनने हे आरोप फेटाळले होते. पण चीनने तैवान व अमेरिकेच्या गुआम बेटावर हल्ल्याची तयारी केल्याचे काही दिवसांपूर्वीच सॅटेलाईट फोटोग्राफ्समधून उघड झाले होते. त्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानवरील हल्ल्यासाठी आखलेल्या योजनेची एक क्लिपही समोर आली होती.

तैवान क्षेत्रातयात, पहिल्या टप्प्यात चीनच्या लष्कराचे जवळपास दीड लाख जवान आणि 953 जहाजे तैवानवर हल्ला चढवतील; तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख जवान तैवान जिंकण्यासाठी रवाना केले जातील, अशी खळबळजनक माहिती समोर आली होती. हा दावा खरा असल्याचे लष्करी विश्लेषकांनी म्हटले होते.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका तैवानला करण्यात येणाऱ्या शस्त्रसहाय्याच्या धोरणात बदल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने दिले आहे. नव्या धोरणानुसार, अमेरिका तैवानला ‘स्मार्ट माईन्स’, ‘ॲटी शिप क्रूझ मिसाईल्स’, ‘एअर डिफेन्स सिस्टिम्स’ व ‘अँटी एअर मिसाईल्स’चा पुरवठा करण्यावर भर देईल, असा दावा संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे. त्याचवेळी गोपनीय माहितीची देवाणघेवाण व सायबरसुरक्षा क्षेत्रातील तंत्रज्ञान यावरही अमेरिका लक्ष केंद्रित करील, असे ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

leave a reply