इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स’ला अमेरिका ‘टेरर लिस्ट’मध्येच ठेवणार

- इस्रायलच्या पंतप्रधानांचा दावा

‘रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स'जेरूसलेम/वॉशिंग्टन – इराणच्या लष्करातील प्रमुख विभाग असलेल्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना अमेरिकेने दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. मात्र अमेरिकेला इराणशी अणुकरार करायचा असेल, तर या यादीतून रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना वगळावे लागेल, अशी शर्त इराणने ठेवली होती. अमेरिकेचे बायडेन प्रशासन ही शर्त मानण्यास तयार झाले असून परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी तसे संकेतही दिले होते. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन तसे करणार नाही, ते रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवाद्यांच्या यादीत कायम ठेवतील, त्यांनी तशी ग्वाही आपल्याला दिल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी म्हटले आहे.

24 एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्यात फोनवरुन चर्चा झाली होती. दोन्ही देशांनी याबाबतचे तपशील जाहीर करण्याचे टाळले होते. पण दोन दिवसांपूर्वी इस्रायलच्या पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे या चर्चेतील संदर्भ प्रसिद्ध केले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला ‘फॉरिन टेररिस्ट ऑर्गनायझेशन’ अर्थात परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत कायम ठेवण्याबाबत बायडेन प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे पंतप्रधान बेनेट म्हणाले.

यामुळे अमेरिका व इस्रायलच्या नेत्यांमध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे उघड झाले. अमेरिकेतील माध्यमांनी याबाबत बातमी प्रसिद्ध केली. तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनांच्या यादीत कायम ठेवण्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोर इराणसाठी सवलतीची खिडकी बंद झाल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला. बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे अणुकरार पुनर्जिवित करण्याच्या वाटा बंद झाल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे.

दहा दिवसांपूर्वी इराणच्या मागण्या मान्य करण्याचे संकेत देणाऱ्या बायडेन प्रशासनाच्या भूमिकेतील या बदलावर आश्चर्य व्यक्त केले जातआहे. इस्रायली पंतप्रधानांची घोषणा आणि अमेरिकन माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर बायडेन प्रशासनाने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण काही तासांपूर्वीच अमेरिकेच्या कोषागार विभागाने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधित इंधनतस्करीच्या नेटवर्कवर निर्बंध लादले आहेत. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या कुद्स फोर्सेस व हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेला या निर्बंधांद्वारे लक्ष्य करण्यात आले.

दरम्यान, गेल्या दहा महिन्यांपासून बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकरारासाठी वाटाघाटी सुरू केल्यानंतर इस्रायल व सौदी अरेबिया नाराज झाले होते. इस्रायलने उघडपणे आपली नाराजी व्यक्त करून इराणबरोबरच्या अणुकराराशी आपण बांधिल नसल्याचे इस्रायलने ठणकावले होते. यानंतर अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅट तसेच रिपब्लिकन पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही या अणुकराराला विरोध केला होता. त्याचे दडपण बायडेन प्रशासनावर आल्याचे दिसत आहे. याचा लाभ घेऊन इस्रायलने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍बाबत अमेरिकेवरील दबाव वाढविल्याचे दिसत आहे.

leave a reply