जगात फक्त 10 आठवडे पुरेल इतकाच गव्हाचा साठा शिल्लक

-विश्लेषिकेचा इशारा

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – जगात सध्या फक्त 10 आठवडे पुरेल इतकाच गव्हाचा साठा शिल्लक आहे, असा इशारा विश्लेषिका सारा मेन्कर यांनी दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या बैठकीदरम्यान मेन्कर यांनी या भयावह स्थितीकडे लक्ष वेधले. 2008 साली आलेल्या जागतिक मंदीनंतर प्रथमच जागतिक स्तरावरील अन्नटंचाईचा मुद्दा तीव्र झाल्याचा दावाही त्यांनी केला. सध्या रशिया-युक्रेनदरम्यान सुरू असणारे युद्ध हे त्यामागील एकमेव कारण नसले तरी या युद्धाने आधीपासून लागलेल्या आगीत तेल ओतल्याचे मेन्कर यांनी बजावले.

wheatफेब्रुवारी महिन्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अन्नधान्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. रशिया व युक्रेन या देशांचा उल्लेख जगाचे ‘ब्रेडबास्केट’ असा करण्यात येतो. गहू, कडधान्य, मका, सूर्यफूल यांच्या उत्पादनात हे देश आघाडीवर आहेत. जागतिक कडधान्याच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे 14 टक्के निर्यात रशिया व युक्रेनमधून केली जाते. रशिया-युक्रेन युद्धामुळे दोन्ही देशांमधील कृषी उत्पादनांवर मोठे परिणाम झाले आहेत. रशियावरील निर्बंधांमुळे या देशातून होणारी अन्नधान्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहेत. तर युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यांमुळे या देशातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचवेळी युक्रेनमधील काही भाग रशियाच्या ताब्यात असल्याने त्यातून होणारी अन्नधान्याची निर्यातही रोखली गेली आहे.

wheat-stockरशिया हा जगातील आघाडीचा गहू उत्पादक देश म्हणून ओळखण्यात येतो. त्याचवेळी जगाला सर्वाधिक गहू निर्यात करणारा देश हीदेखील रशियाची ओळख आहे. मात्र निर्बंधांमुळे गहू व त्याबरोबरच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आले आहेत. त्यामुळे जगातील अनेक देशांना गव्हाचा पुरेसा पुरवठा झालेला नसून आशिया व आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये गव्हाची टंचाई भासू लागली आहे. पाश्चिमात्य देशांनी याचे खापर सरसकट रशियावर फोडले आहे. मात्र रशियाने आपल्यावरील आरोप नाकारले असून योग्य स्थिती निर्माण झाल्यास आपण निर्यात सुरू करु शकतो, असे आश्वासन दिले. यासंदर्भात रशिया व तुर्कीमध्ये चर्चा सुरू असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. मात्र रशिया व युक्रेनमधील गव्हाची निर्यात सुरू झाली नाही तर जगासमोर उभ्या ठाकलेल्या भयावह अन्नटंचाईची जाणीव मेन्कर यांच्या वक्तव्यातून होत आहे. मेन्कर ‘ग्रो इंटेलिजन्स’ या तंत्रज्ञानविषयक कंपनीच्या संस्थापिका व प्रमुख आहेत.

leave a reply