अमेरिकेवरील ड्रोनहल्ले रोखण्यासाठी ‘सीआयए’ला अधिकार देण्याची योजना

वॉशिंग्टन – अमेरिकेत गेल्या काही वर्षात वाढलेला ड्रोन्सचा वापर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही धोका ठरु शकतो, असा दावा बायडेन प्रशासनाने केला आहे. या पार्श्वभूमीवर ड्रेोन्सचे हल्ले रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाने नवी योजना जाहीर केली. या यानुसार अमेरिकेत होणारे ड्रोनहल्ले रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’लाही अधिकार देण्याचा समावेश आहे. ‘सीआयए’व्यतिरिक्त परराष्ट्र विभाग, संरक्षण विभाग तसेच ‘नासा’लाही ड्रोन्सच्या विरोधात कारवाईची परवानगी देण्यात येणार आहे.

गेल्या दशकापासून अमेरिकेत ड्रोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’च्या माहितीनुसार, सध्या अमेरिकेत साडेआठ लाखांहून अधिक ड्रोन्स सक्रिय आहेत. त्यातील तीन लाखांहून अधिक ड्रोन्स व्यावसायिक कारणांसाठी वापरले जातात. यात चित्रिकरण, मालाची ने-आण, संशोधन यांचा समावेश आहे. ड्रोन्सचा वाढता वापर अमेरिकन समाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला असला तरी दुसऱ्या बाजूला ड्रोन्स राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका बनत असल्याचा दावा ‘व्हाईट हाऊस’ने केला आहे.

अनेक विघातक तसेच गुन्हेगारी गटांकडून ड्रोन्सचा वापर वाढत असल्याकडे लक्ष वेधून, हे रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाने नवी योजना सादर केली आहे. ‘डोमेस्टिक काऊंटर अनमॅन्ड् एअरक्राफ्ट सिस्टिम्स नॅशनल ॲक्शन प्लॅन’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत आठ शिफारशींचा समावेश आहे. त्यात गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’सह नासा, परराष्ट्र विभाग, संरक्षण विभाग यांनाही ड्रोन्सचा मुकाबला करण्याचे अधिकार देण्याचे संकेत आहेत. यासाठी अमेरिकी संसदेत नवे विधेयक सादर करण्यात येईल, असे बायडेन प्रशासनाने जाहीर केले.

यापूर्वी संसदेने केलेल्या विधेयकात ‘डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटी’ व न्याय विभागाला ड्रोन्सच्या विरोधात कारवाईचे अधिकार देण्यात आले होते. मात्र आता इतर यंत्रणांनाही त्यात समाविष्ट करून घेण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत. यातील गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चा समावेश लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. आतापर्यंत सीआयएचा वापर विदेशी संस्था, नागरिक व हेरांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच परदेशातील मोहिमा राबविण्यासाठी करण्यात येत होता. मात्र बायडेन प्रशासनाच्या योजनेमुळे आता ‘सीआयए’ला अमेरिकन नागरिक, गट व यंत्रणांविरोधातही कारवाईचे अधिकार मिळू शकतील.

leave a reply