वरकरणी बलाढ्य दिसणारा चीन आतून पोखरलेला आहे

- ब्रिटनच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांचा दावा

टोकिओ – चीन वरकरणी कितीही बलाढ्य देश दिसत असला, तरी प्रत्यक्षात हा देश आतून पोखरलेला आणि कमकुवत आहे. अंतर्गत समस्यांमुळे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला फार मोठा धोका संभवतो. याच कारणामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आपल्या लष्करापेक्षाही अंतर्गत सुरक्षेवर अधिक खर्च करीत आहेत. तसेच अंतर्गत शत्रूंमुळे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग असुरक्षित बनले आहेत, असा निष्कर्ष ब्रिटनचे माजी राजनैतिक अधिकारी व विख्यात लेखक रॉजर गार्साईड यांनी नोंदविला.

वरकरणी बलाढ्य दिसणारा चीन आतून पोखरलेला आहे - ब्रिटनच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांचा दावाचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कारकिर्दीचे दुसरे सत्र संपत आले असून ते सलग तिसर्‍यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनण्याची तयारी करीत आहेत. यासाठी नियमांमध्ये फेरफार करण्यात आले असून यावर जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी अतिशय नाराज आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षामध्ये यावर तीव्र मतभेद आहेतच. अशा परिस्थितीत कम्युनिस्ट पक्षाचे काही मातब्बर नेते राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विरोधात बंड पुकारू शकतात, असा दावा गार्साईड यांनी केला. ब्रिटनचे चीनमधील राजदूत म्हणून काम केलेल्या रॉजर गार्साईड हे चीनविषयक तज्ज्ञ मानले जातात. म्हणूनच त्यांनी नोंदविलेल्या या निष्कर्षाला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

सध्याची चीनची कम्युनिस्ट पक्षाची राजवट अत्यावस्थ स्थितीत आहे. ही व्यवस्था पूर्णपणे बदलण्याखेरीज पर्याय नाही. लोकशाही हाच या व्यवस्थेला पर्याय ठरू शकतो, असा दावा गार्साईड यांनी एका जपानच्या दैनिकाशी बोलताना केला. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग चीनला अत्यंत धोकादायक दिशेने पुढे नेत आहेत, अशी भावना कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये बळावले आहे. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांना देखील जिनपिंग यांच्या धोरणांची चिंता वाटू लागली आहे. जिनपिंग यांच्यामुळे आपले भवितव्यही धोक्यात येईल, या चिंतेने पंतप्रधान केकियांग तसेच कम्युनिस्ट पक्षाच्या इतर नेत्यांना ग्रासले आहे.

चीनने केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे या देशातील खाजगी क्षेत्र काही प्रमाणात प्रभावशाली बनले असून या क्षेत्राकडेही थोडीफार शक्ती आली आहे. त्याचा वापर करून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न चीनच्या खाजगी क्षेत्राकडून केला जात आहे, यांची नोंद गार्साईड यांनी केली. काही बलाढ्य चिनी कंपन्या जिनपिंग यांच्या विरोधात आपला पैसा वापरू शकतात व इतर नेत्यांना पाठिंबा देऊन जिनपिंग यांच्या विरोधात बंड घडवून आणू शकतात, याकडे गार्साईड यांनी लक्ष वेधले आहे.

याआधीही चीनच्या कम्युनिस्ट राजवटीमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या हाती एकवटलेल्या अधिकारांच्या विरोधात चीनच्या काही नेत्यांनी व्यक्त केलेली नाराजी, आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनली होती.

leave a reply