सिरियातील ‘आयएस’चा धोका वाढत आहे

- सिरियन कुर्द नेत्याचा इशारा

दमास्कस/वॉशिंग्टन – ‘आम्ही आजही आयएसच्या दहशतवाद्यांनी घेरलेले आहोत. जर आत्ता आयएसशी लढण्याचा प्रयत्न केला नाही तर ही संघटना आपला विस्तार करील’, असा इशारा सिरियातील अमेरिका समर्थक ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’ या कुर्द संघटनेचे प्रमुख मझलूम अब्दी यांनी दिला. गेल्या आठवड्यात सिरियातील अमेरिकेच्या हवाईहल्ल्यात आयएसचा नेता ठार झाल्यानंतरही हा धोका टळलेला नाही, असे अब्दी यांनी स्पष्ट केले.

सिरियातील ‘आयएस’चा धोका वाढत आहे - सिरियन कुर्द नेत्याचा इशारागेल्या महिन्यात सिरियाच्या ईशान्येकडील कुर्दांच्या ताब्यातील अल-सिना तुरुंगावर ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. या तुरुंगात आयएसचे तीन हजारांहून अधिक दहशतवादी कैद आहेत. आपल्या साथीदारांच्या सुटकेसाठी आयएसने जवळपास दहा दिवस कुर्द बंडखोरांशी संघर्ष केला. यावेळी आयएसच्या दहशतवादी अत्याधुनिक रायफल्स, स्नायपर रायफल्स आणि लष्करी वाहनांनी सज्ज असल्याचे उघड झाले होते.

या संघर्षात जवळपास ५०० जणांचा बळी गेला होता. यामध्ये १२१ सिरियन कुर्दांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर आयएसचे शेकडो दहशतवादी तुरुंगातून पसार झाले होते. पुढच्या दोन दिवसांमध्ये या दहशतवाद्यांना पुन्हा कैद करण्यात यश मिळाल्याचा दावा कुर्दांनी केला होता. पण या हल्ल्यामुळे आयएस पुन्हा एकदा जोर पकडत असल्याची चिंता आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक व माध्यमांनी व्यक्त केली होती. अल-सिना तुरुंगावरील हल्ल्याची योजना सिरियातील आयएसचा वरिष्ठ नेता अबू इब्राहिम अल-कुरेशीने आखली होती. सिरियातील ‘आयएस’चा धोका वाढत आहे - सिरियन कुर्द नेत्याचा इशारागेल्या आठवड्यात अमेरिकेने सिरियात हवाई हल्ला चढवून कुरेशी आणि त्याच्या साथीदाराला ठार केले. सिरिया व इराकमधील आयएसच्या नेटवर्कसाठी हा मोठा हादरा असल्याचे बोलले जाते. पण यामुळे आयएसच्या कारवायांमध्ये फरक पडणार नसल्याचा दावा कुर्द नेते अब्दी यांनी केला. सिरियातील आयएसचा धोका अजूनही कायम असून त्याविरोधात व्यापक कारवाईची आवश्यकता असल्याचे अब्दी यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर आयएसशी संघर्ष करण्यामध्ये आपण आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत नसल्याचा आरोप कुर्द नेत्यांनी केला.

‘गेल्या वर्षी सिरियाच्या हसाकेह प्रांतात आयएसचे स्लिपर सेल हल्ला चढविणार असल्याची माहिती मिळाली होती. पण आयएसचा हल्ला रोखण्यात आणि या दहशतवाद्यांना संपविण्यात आपण अपयशी ठरलो’, असे सांगून अब्दी यांनी अप्रत्यक्षरित्या अमेरिकेला लक्ष्य केले. तसेच पाश्‍चिमात्य देश आयएसच्या दहशतवाद्यांनी भरलेल्या सिरियातील तुरुंगांचा ताबा घेण्यासाठी तयार नसल्याची टीका अब्दी यांनी केली.
दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने देखील काही दिवसांपूर्वी आयएस अजूनही तितकीच धोकादायक असल्याचे मान्य केले होते.

leave a reply