जैविक शस्त्रांचा वापर करून चीन तैवानवर हल्ला चढविल

- अमेरिकन विश्लेषकांचा दावा

तैवानवर हल्लावॉशिंग्टन – चीनने तैवानजवळ ‘रॅपिड स्ट्राईक’ आणि ‘रॉकेट फोर्सेस’ची धोकादायक तैनाती केली असून लवकरच चीन तैवानवर हल्ला चढविल, असा इशारा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक लँड फोर्सेसचे प्रमुख जनरल चार्ल्स फ्लिन यांनी दिला. पण तैवानवर थेट हल्ला चढवून अमेरिकेला सर्वंकष युद्धाची चिथावणी देण्यापेक्षा चीन तैवानच्या विरोधात इतर पर्यायांचा वापर करील, असा दावा अमेरिकेतील विश्लेषक करीत आहेत. थेट लष्करी संघर्ष टाळण्यासाठी चीन तैवानवर बायोवेपन्स अर्थात जैविक शस्त्रास्त्रांचा वापर करील, असे अमेरिकन अभ्यासगट व विश्लेषकांनी बजावले आहे. तसेच चीन सायबर हल्ल्यांचा वापर करून तैवानमध्ये अनागोंदी देखील माजवू शकतो, अशी शक्यता अमेरिकन यंत्रणा वर्तवित आहेत.

चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी गेल्या काही दिवसांपासून धोकादायक लष्करी हालचाल करीत आहे. चीनव्याप्त तिबेटमधील ‘वेस्टर्न मिलिटरी डिस्ट्रिक्ट’च्या भागात चीनने १२ नवे हवाईतळ उभारले आहेत. या भागात चीनकडून सैन्यतैनातीत वाढ करण्यात आल्याचे जनरल फ्लिन यांनी ‘अमेरिकन एंटरप्राईज्‌‍ इन्स्टिट्यूट’मधील बैठकीत सांगितले. त्याचबरोबर चीनने मेकाँग नदीचे पाणी रोखल्याचा दावाही फ्लिन यांनी केला. तैवानच्या आखातातील बेटांजवळही चीनने सैन्यतैनाती केल्याचे फ्लिन यांनी म्हटले आहे. तैवानजवळच्या चीनच्या या लष्करी हालचाली अतिशय धोकादायक असल्याचा इशारा फ्लिन यांनी केला.

तैवानवर हल्ला

पण चीन तैवानजवळच्या बेटांवर हल्ला चढवून युद्धाची सुरुवात करण्याच्या शक्यतेवर अमेरिकेतील लष्करी विश्लेषकांनी आपले निष्कर्ष नोंदविले. दुसऱ्या महायुद्धात ओकिनावा आणि नॉर्मंडीवर हल्ला चढवून मित्रदेशांच्या आघाडीने मुसंडी मारली होती. हा जुन्या काळातील युद्धाचा भाग होता. पण आधुनिक काळातील चीन तैवानविरोधात युद्ध पुकारण्यासाठी येथील सागरी क्षेत्रातील पेंघूस किंवा किनमेन बेटांवर हल्ले चढविणार नाही. कारण तसे केले तर तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका या संघर्षात उतरेल आणि त्यानंतर चीन-अमेरिका युद्ध पेट घेईल, याकडे ‘२०४९ रिसर्च इन्स्टिट्यूट’चे विश्लेषक इयन इस्टन आणि ‘युएस नेवल वॉर कॉलेज’चे प्राध्यापक पिअर्स वूड यांनी लक्ष वेधले. अमेरिकेच्या सहाय्याने तैवानने चीनविरोधी संघर्षासाठी लष्करी सज्जता ठेवली आहे. अशा परिस्थितीत, तैवानवर हल्ला चढविलाच तर पराभवाची नामुष्की ओढावून आपल्याला कम्युनिस्ट राजवटीची सत्ताही गमवावू लागू शकते, याची जाणीव चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आहे. त्यामुळे तैवानवर ताबा मिळविण्यासाठी चीन बायोवेपन्स अर्थात जैव शस्त्रास्त्रांचा देखील वापर करू शकतो, असा इशारा ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडिज्‌‍ अँड एनालिसीस्‌‍, या दोन अभ्यासगटांनी दिला. चीनने पारित केलेल्या ‘२०२० बायोडिफेन्स लॉ’ अंतर्गत कम्युनिस्ट राजवट रिसिन, अँथ्रॅक्स आणि बोटूलिनम यांचा जैव शस्त्रास्त्रासारखा वापर करू शकते, असा दावा अमेरिकन अभ्यासगटांनी केला.

त्याचबरोबर तैवानला गुडघ्यावर आणण्यासाठी चीन मोठा सायबर हल्ला देखील घडवू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या ‘सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी’चे संचालक जेन इस्टर्ली यांनी दिला. फक्त तैवान नाही तर अमेरिकेच्या पायाभूत सुविधांवरही सायबर हल्ले होऊ शकतात, असेही इस्टर्ली यांनी कार्नी मेलॉन विद्यापीठात बोलताना बजावले. अमेरिकेतील पाण्याचे तसेच गॅस पाईपलाईन्स, संपर्क यंत्रणा तसेच वाहतूक व्यवस्था देखील लक्ष्य होऊ शकतात, असा दावा इस्टर्ली यांनी केला.

leave a reply