ब्रिटनमध्ये अन्नधान्यांचे दर कडाडल्याने जनतेचे हाल

लंडन – ब्रिटनमधील अन्न महागाई विक्रमी स्तरावर पोहोचली असून सामान्य ब्रिटीश नागरिकासमोर जीवनावश्यक खर्चाचे संकट वाढत चालले आहे. देशातील २५ टक्के कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट असल्याची धक्कादायक माहिती स्थानिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. दरम्यान, ब्रिटनमधील मोठमोठ्या कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत असल्याच्या बातम्या याआधीच प्रसिद्ध झाल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या जागतिक महागाईचा फटका पाश्चिमात्य देशांना बसत आहे. अमेरिकेसह युरोपिय देशांमध्ये महागाई, बेरोजगारी वाढत असून यासंबंधीची माहिती समोर येत नसल्याचा दावा आर्थिक विश्लेषक करीत आहेत. ब्रिटनही या महागाईच्या संकटातून सुटलेला नाही. ‘कॅन्टार’ या माहिती पुरविणाऱ्या संघटनेने केल्या सर्वेक्षणानुसार गेल्या चार आठवड्यात ब्रिटनमधील अन्नधान्याच्या किंमतीत १७.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धानंतर निर्माण झालेल्या इंधनाच्या संकटानंतर अन्न महागाई हे ब्रिटीश जनतेवर कोसळलेले दुसरे मोठे संकट ठरते, असे या संघटनेने म्हटले आहे.

कॅन्टारने आपल्या सर्वेक्षणासाठी ब्रिटनमधील १० हजार जणांची माहिती घेतली. यामध्ये एक चतुर्थांश अर्थात २५ टक्के कुटूंब आर्थिकदृष्ट्या धडपडत असल्याचे उघड झाले आहे. ही माहिती अतिशय चिंताजनक असल्याचे ब्रिटनमधील ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे. काही कुटूंब एकवेळचे अन्न घेत असल्याचा दावा या संघटनेने केला. या महागाईचे परिणाम ब्रिटनच्या शेअर बाजारावर देखील पहायला मिळत आहे.

leave a reply