येत्या काही दिवसात पूर्व रशियासह आग्नेय आशियाई देशांना भूकंपाचा मोठा धक्का बसेल

- तुर्की भूकंपाचे भाकित करणाऱ्या डच संशोधकाचा इशारा

भूकंपाचा मोठा धक्काॲमस्टरडॅम – गेल्या महिन्यात तुर्की व सिरियात झालेल्या भूकंपाबाबत काही दिवस आधी भाकित वर्तविणाऱ्या फ्रँक हूगरबीटस्‌‍ या डच संशोधकांनी नवा इशारा दिला आहे. २ ते ७ मार्च या कालावधीत पृथ्वीला मोठ्या भूकंपाचा धक्का बसू शकतो, असे हूगरबीटस्‌‍ यांनी बजावले. ‘रशियाच्या अतिपूर्वेकडील कॅमचॅट्का प्रांत, कुरिल आयलंडस्‌‍चा भाग ते आग्नेय आशियातील फिलिपाईन्स व इंडोनेशिया या देशांना भूकंपाचे तीव्र धक्के बसू शकतात. ही अतिशयोक्ती नाही किंवा घाबरवण्याचा प्रयत्न नाही, तर हा इशारा आहे’, असा खुलासाही हूगरबीटस्‌‍ यांनी केला.

‘सोलर सिस्टिम जॉमेट्री सर्व्हे’ या संस्थेत संशोधन करणाऱ्या हूगरबीटस्‌‍ यांनी ३ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये तुर्की, सिरिया, लेबेनॉन, जॉर्डन या भागात ७.५ रिश्टर स्केल व त्यापेक्षा जास्त क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसेल, असा इशारा दिला होता. तुर्कीसह इतर काही आघाडीच्या देशांमधील संशोधक तसेच वैज्ञानिक संस्थांनी हा इशारा फेटाळून लावला होता. पण ६ फेब्रुवारी रोजी तुर्की व सिरियात ७.८ रिश्टर स्केल भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्यानंतर हूगरबीटस्‌‍ यांच्या इशाऱ्यांकडे सारेजण गंभीरपणे पाहू लागले होते.

हूगरबीटस्‌‍ यांनी आपण अंतराळातील ग्रह ताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करून त्यानुसार भाकित करतो, असे म्हटले होते. २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी सोशल मीडियावर नव्या भूकंपाबाबत भाकित वर्तविणारी पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये सोशल मीडियावरील व्हिडिओचा समावेश असून २ ते ७ मार्च या काळातील ग्रहताऱ्यांची स्थिती व भूकंपाची शक्यता याची माहिती देण्यात आली आहे. डच संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत ८ रिश्टर स्केलपेक्षा अधिक मोठ्या भूकंपाची शक्यता आहे. भूकंपाचा धक्का रशियाचा कॅमचॅट्का प्रांत, कुरिल आयलंडस्‌‍चा भाग ते आग्नेय आशियातील फिलिपाईन्स व इंडोनेशिया हा परिसर असू शकतो, असे हूगरबीटस्‌‍ यांनी बजावले. रशियाच्या ॲकेडमी ऑफ सायन्सेसमधील संशोधिका डॅनिला चेब्रोव्ह यांनी डच संशोधकांचा इशारा फेटाळला आहे. चेब्रोव्ह यांनी हूगरबीटस्‌‍ यांच्या भाकितांवर सवाल उपस्थित केले असून ते हौशी संशोधक असल्याची टीका केली आहे.

सौरमालेतील ग्रहताऱ्यांची स्थिती व त्यांच्या हालचाली आणि पृथ्वीवरील भूकंप यांचा संबंध अतिशय कमकुवत असून त्याचा भाकितासाठी वापर अडचणीत आणणारा ठरु शकतो, असे रशियन संशोधिकेने बजावले आहे.

leave a reply