एलॉन मस्कच्या स्टारलिंकला नष्ट करण्यासाठी चीन शस्त्र तयार करणार

स्टारलिंकला नष्टबीजिंग – चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. जगभरात कुठेही सुपर हायस्पिड इंटरनेट डाटा पुरविण्यासाठी मस्कने प्रक्षेपित केलेले ‘स्टारलिंक’ सॅटेलाईट्स नष्ट करण्यासाठी चीन शस्त्र तयार करीत आहे. चीनच्या लष्कराने आपल्या संशोधकांना तसे आदेश दिले आहेत. चिनी लष्कराच्या कागदपत्रातून ही माहिती समोर आली. आत्तापर्यंत एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ अंतराळ कार्यक्रमाअंतर्गत स्टारलिंकचे 2,400 सॅटेलाईट्स सध्या पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत आहेत. येत्या काळात असे किमान 30 हजार सॅटेलाईट्स पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून जगभरात कुठेही अतिशय वेगवान इंटरनेट सेवा पुरवतील, असा दावा मस्क यांनी केला आहे. याचा फायदा विकसनशील तसेच गरीब देशांनाही होईल, असे सांगितले जाते. पण सदर स्टारलिंक उपग्रह लष्कराशी जोडलेले असल्याची चिंता चीनला सतावित आहे.

हे उपग्रह अमेरिकेच्या लष्कराला अंतराळावर वर्चस्व मिळविण्यासाठी सहाय्यक ठरतील, अशी भीती चीनला वाटत आहे. चीनच्या लष्करी अहवालात विश्लेषकांनी यावर उघड चिंता व्यक्त केली. तसेच मस्क यांच्या या स्टारलिंक उपग्रहांना नष्ट करण्यासाठी वेगवेगळे उपाय लष्करी विश्लेषक सुचवित आहेत. हे उपग्रह निकामी करून त्यांना नष्ट करण्यावर चिनी शास्त्रज्ञांना विचार करावा लागेल. यासाठी नवे शस्त्र तयार करावे लागेल, असे या लष्करी विश्लेषकांनी सुचविले आहे.

गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा चीनच्या लष्करी विश्लेषकांनी मस्क यांच्या स्टारलिंकविरोधात शस्त्र वापरण्याची मागणी केली आहे.

leave a reply