टेक्सासमधील 21 जणांच्या हत्याकांडानंतरही ‘गन कंट्रोल’च्या मुद्यावर अमेरिकेतील तीव्र राजकीय मतभेद कायम

‘गन कंट्रोल'वॉशिंग्टन – मंगळवारी अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील शाळेत 18 वर्षाच्या माथेफिरुने घडविलेल्या हत्याकांडात 21 जणांचा बळी गेला. यात अनेक लहान मुलांचा समावेश आहे. या हत्याकांडानंतर अमेरिकेत बंदुकांच्या वापरावर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, बंदुकीमुळे होणाऱ्या हिंसाचाराच्या मुद्यावर संसदेने ठामपणे उभे रहावे व कठोर कायदे मंजूर करावेत, असे आवाहन केले आहे. मात्र या मुद्यावर अमेरिकेतील आघाडीच्या पक्षांमध्ये असलेले तीव्र मतभेद पाहता संसदेत किंवा राज्यांमध्ये नवे कायदे मंजूर होण्याची शक्यता कमी आहे, असे मत माध्यमे तसेच विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

अमेरिकेत गेल्या दशकभरात ‘मास शूटिंग’च्या 25 मोठ्या घटना घडल्या आहेत. 2012 साली कनेक्टिकट राज्यात घडलेली ‘सँडी हूक एलिमेंटरी स्कूल’मधील घटना यातील सर्वात भीषण घटना म्हणून ओळखण्यात येते. या घटनेनंतर अमेरिकन संसदेसह अनेक राज्यांमध्ये ‘गन कंट्रोल’संदर्भातील विधेयके व नियम कठोर करण्याच्या प्रयत्नांना वेग मिळाला होता. मात्र 10 वर्षांनंतरही अमेरिकेतील परिस्थिती फारशी बदललेली नाही. अमेरिकेच्या संसदेत ‘गन कंट्रोल’साठी कठोर विधेयक अजूनही मंजूर होऊ शकलेले नाही. बंदुकीच्या वापरावर नियंत्रण आणण्याच्या कायद्याला राज्यघटनेत असलेल्या ‘सेकंड अमेंडमेंट’च्या आधारावर विरोध करण्यात आला आहे. या दुरुस्तीनुसार, अमेरिकी नागरिकांना शस्त्र बाळगण्याची मुभा देण्यात आली आहे.

‘गन कंट्रोल'अमेरिकेतील राज्यांना ‘गन कंट्रोल’संदर्भात कायदे करण्याचे अधिकार आहेत. मात्र गेल्या दशकभरात फक्त 13 राज्यांनी यासंदर्भातील कायदे मंजूर केले आहेत. ही सर्व राज्ये डेमोक्रॅट पक्षाचे वर्चस्व असलेली आहेत. त्याउलट रिपब्लिकन पक्षाची सत्ता असलेल्या 14 राज्यांनी विशेष परवाना नसतानाही आपल्या नागरिकांना बंदुका बाळगण्याचे अधिकार दिले आहेत. रिपब्लिकन पक्षाची सत्ता असलेल्या फ्लोरिडा या एकमेव राज्याने ‘गन कंट्रोल’संदर्भातील कायदे मंजूर केले आहेत. मात्र त्यात बदल अथवा कठोर तरतुदी करण्यास नकार देण्यात आला आहे. डेमोक्रॅट पक्षाचे गव्हर्नर असलेल्या विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हेनिया, मिशिगन यासारख्या राज्यांमध्ये स्थानिक विधिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असल्याने त्यातही ‘गन कंट्रोल’चे कायदे मंजूर होऊ शकलेले नाहीत.

कायदे मंजूर न होण्यामागे ‘सेकंड अमेंडमेंट’बरोबरच अमेरिकेतील अत्यंत प्रभावशाली असणारी ‘गन लॉबी’हेदेखील महत्त्वाचे कारण ठरले आहे. ‘नॅशनल रायफल असोसिएशन’ नावाची संघटना अमेरिकेतील अत्यंत प्रभावशाली संघटनांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या संघटनेचे समर्थक अमेरिकेतील दोन्ही आघाडीच्या पक्षांमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून या लॉबीने बंदुकीच्या वापराला विरोध करणाऱ्या अनेक तरतुदी उधळून लावल्या आहेत. बंदुकींवर नियंत्रण आणण्याऐवजी अंतर्गत सुरक्षाव्यवस्था व इतर यंत्रणा अधिक सक्षम करा, अशी मागणी या लॉबीकडून सातत्याने करण्यात येते.

leave a reply