तैवानच्या स्वातंत्र्याविरोधात चीन अखेरपर्यंत संघर्ष करीत राहिल

-चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

Chinese-armyसिंगापूर – ‘तैवानला जर कोणी चीनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर चीन सर्वशक्तीनिशी व अखेरपर्यंत संघर्ष करीत राहिल. त्याव्यतिरिक्त चीनसमोर इतर कोणताही पर्याय असणार नाही. प्रादेशिक एकात्मता कायम राखण्यासाठी चीनच्या संरक्षणदलांचा निर्धार व क्षमता कमी लेखण्याची चूक कुणीही करु नये’, असा इशारा चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगहे यांनी दिला. सिंगापूर येथे सुरू असलेल्या शांग्री-ला या सुरक्षाविषयक बैठकीत तैवानवरून इशारा देतानाच, चीनने अण्वस्त्रनिर्मितीत मोठी प्रगती केल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी बजावले.

Taiwan-independenceशनिवारी शांग्री-ला बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी, इंडो-पॅसिफिक क्षेत्र व तैवानला चीनपासून संभवणाऱ्या धोक्यांचा जाहीरपणे उल्लेख केला होता. तैवानचा ताबा मिळविण्यासाठी चीन युद्ध करू शकतो, असे सांगून अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी यावर चिंता व्यक्त केली होती. इंडो-पॅसिफिकमधील क्षेत्रांवर चीनने आक्रमकपणे दावे ठोकले आहेत, तसेच या क्षेत्रातील चीनच्या कारवाया देखील तणाव वाढवित असल्याकडे ऑस्टिन यांनी लक्ष वेधले होते. यातील तैवानच्या मुद्यावरून चीनकडून आक्रमक प्रत्युत्तर आले आहे. संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगहे यांचा इशारा त्याचाच भाग ठरतो.

‘काही देश चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी वारंवार तैवान कार्डाचा वापर करीत आहेत. पण चीनचे तैवानबरोबरील विलिनीकरण कोणीही रोखू शकणार नाही. चीनचे विभाजन करण्यासाठी तैवानच्या स्वातंत्र्याला समर्थन देणाऱ्यांची अखेर चांगली होणार नाही’, असे चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी बजावले. अमेरिकेने चीनला रोखण्याचे व लक्ष्य करण्याचे तसेच हितसंबंधांना धक्का लावण्याचे प्रयत्न करु नयेत, असेही जनरल फेंगहे यांनी खडसावले. यावेळी संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगहे यांनी चीनच्या वाढत्या आण्विक क्षमतेचाही उल्लेख केला.

taiwan‘चीन गेली पाच दशके आपली आण्विक क्षमता विकसित करीत आहे. या कालावधीत चीनने आण्विक क्षमतेत चांगली प्रगती केली आहे. याबाबतीत चीनच्या धोरणात बदल झालेला नाही. चीन पहिल्यांदा अण्वस्त्राचा वापर करणार नाही. चीनची अण्वस्त्रे स्वसंरक्षणासाठी आहेत’, असे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगहे यांनी सांगितले. त्याचवेळी अमेरिका-चीन संबंध निर्णायक वळणावर असून ते सुधारण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

तैवान हा आपला सार्वभौम भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. तैवानमधील स्वतंत्रतावादी गटांनी चीनला चिथावणी देणे सुरू ठेवले आणि मर्यादा ओलांडली तर तैवानवर निर्णायक कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे चीनने बजावले होते. त्याचबरोबर चीनशी सहकार्य करणाऱ्या देशांनी ‘वन चायना पॉलिसी’चा आदर करून तैवानबरोबर कुठल्याही प्रकारचे राजकीय व लष्करी सहकार्य ठेवू नये, अशी चीनची स्पष्ट भूमिका आहे. पण चीनच्या या अरेरावीला न जुमानता अमेरिकेच्या संरक्षण विभागाने तैवानबरोबर लष्करी सहकार्य कायम ठेवले आहे. यावर खवळलेल्या चीनने याआधीही अमेरिकेला लष्करी कारवाईचा इशारा दिला होता.

leave a reply