इराण-व्हेनेझुएलामध्ये 20 वर्षांच्या सहकार्याचा करार

तेहरान – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांच्या इराणभेटीत दोन्ही देशांमध्ये सुमारे 20 वर्षाच्या सहकार्याचा करार संपन्न झाला. ऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञान, खनिज आणि कृषी क्षेत्रातील सहकार्याचा यामध्ये समावेश आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेने लादलेले कठोर निर्बंध मागे घेतले जात असताना, या निर्बंधांच्या काळात आपल्या मागे उभे राहणाऱ्या इराणशी सहकार्य वाढवून व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली राजकीय भूमिका बदललेली नसल्याचा संदेश दिला आहे.

गेल्या आठवड्यात व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह दोन दिवसांचा इराण दौरा केला. यावेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी उभय देशांमधील जुने सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा केली. ऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी आणि पर्यटन या क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी 20 वर्षांसाठी करार करण्यात आला. तसेच दोन्ही देशांमधील संबंधी धोरणात्मक स्तरावर नेण्याचेही राष्ट्राध्यक्ष रईसी आणि राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी मान्य केले.

अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, सहकार्य वाढविण्यावर इराण व व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये एकमत झाले. अमेरिकेने लादलेले निर्बंध म्हणजे पुढे जाण्याची संधी असल्याचा दावा इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केला. अमेरिकेसासरख्या साम्राज्यवादी शत्रू देशाने लादलेल्या निर्बंधांना जबरदस्त प्रतिकार केला, म्हणून उभय देशांनी परस्परांचे कौतूक केले. तर अमेरिकेच्या निर्बंधांचा दबाव झुगारून देण्यात इराणला फार मोठे यश मिळाल्याचे राष्ट्राध्यक्ष रईसी म्हणाले. यानंतर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणचे सर्वोच्चधार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांची भेट घेतली.

राष्ट्राध्यक्ष मदुरो इराणच्या दौऱ्यावर असताना, लॅटिन अमेरिकी देश अर्जेंटिनाने आपला शेजारी देश असलेल्या व्हेनेझुएलाचे मालवाहू विमान ताब्यात घेतले आहे. व्हेनेझुएलाची राष्ट्रीय विमान कंपनीचे बोईंग 747 मालवाहू विमान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधित असल्याचा आरोप अर्जेंटिनाने केला आहे. व्हेनेझुएलाच्या आधी या विमानांचा वापर इराणच्या महान एअरलाईन्सने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या साथीने तस्करीसाठी केला होता. 2008 साली अमेरिकेने इराणी विमान कंपनीवर निर्बंध टाकले होते. या पार्श्वभूमीवर, व्हेनेझुएलाच्या या विमानांवर कारवाई केल्याचे अर्जेंटिनाने जाहीर केले.

दरम्यान, इराण आपल्या सहकारी देशांबरोबर दीर्घकालिन सहकार्य करार करण्याला प्राधान्य देत असल्याचे आखाती माध्यमे लक्षात आणून देत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला रशियाच्या उपपंतप्रधानांनी इराणचा दौरा केला होता. या दौऱ्यात इराण-रशियाने ‘बार्टर ट्रेड’ अर्थात चलनाचा वापर न करता वस्तूच्या मोबदल्या वस्तूंचा व्यवहार सुरू करण्यावर चर्चा केली. तसेच रशिया आणि इराणमध्ये 20 वर्षांसाठी सहकार्य करार करण्यावर चर्चा केली. तर गेल्या वर्षी इराणने चीनबरोबर पुढच्या 25 वर्षासाठी गुंतवणूक तसेच इतर क्षेत्रातील सहकार्याचा करार केला होता. दोन महिन्यांपूर्वी या कराराची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

leave a reply