अमेरिकेने दबाव टाकल्यानंतरही चीन उघडपणे रशियाच्या विरोधात जाणार नाही

- पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चर्चा सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचे नेते व माध्यमे अमेरिकेला चीनकडून असलेली अपेक्षा आक्रमकतेने मांडत होते. युक्रेनवर हल्ला चढविणार्‍या रशियाचा चीनने निषेध केलेला नाही, याचा दाखला अमेरिकेची माध्यमे देत आहेत. ही बाब राष्ट्राध्यक्ष बायडेन चीनसमोर ठामपणे मांडणार असून चीनच्या राष्ट्राध्यक्षांना याबाबत जाब विचारणार असल्याचे दावेही अमेरिकी माध्यमांनी केले होते. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सदर चर्चेच्या आधी यासंदर्भातील आपल्या देशाची भूमिका तितक्याच आक्रमकतेने समोर ठेवल्याचे दिसते आहे.

चीनने युक्रेनच्या जनतेसाठी मानवी सहाय्य पुरविण्यास पुढाकार घेतला होता. मात्र याच्या पलिकडे जाऊन रशियाबरोबरील आपल्या संबंधांवर परिणाम होणार नाही, अशी भूमिका स्वीकारण्याचे चीन टाळत आहे. उलट अमेरिका व नाटोच्या आक्रमकतेमुळेच रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला, असे चीनचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर सध्या युक्रेनच्या जनतेला तोफा, मशिनगन्सची गरज आहे की अन्नाची असा प्रश्‍न चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला केला होता. उघडपणे रशियाच्या विरोधात जाण्यास चीन तयार नसून उलट यासाठी चीनवर दडपण टाकणार्‍या अमेरिका व युरोपला चीनकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात असल्याचे दिसत आहे.

युरोपिय देशांनी आधीच चीनबरोबरील सहकार्य गमावले आहे. आता चीनचे सहकार्य गमावण्याचा धोका युरोपिय देशांनी पत्करू नये, असा संदेश चीन देत आहे. याची दखल घेऊन बायडेन प्रशासनाने यावर चीनला जाब विचारण्याची तयारी केल्याचे दावे अमेरिकेची माध्यमे करीत आहेत. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलताना रशियाबरोबरील चीनच्या सहकार्याचा मुद्दा नक्कीच उपस्थित करतील, त्यासाठी ही उत्तम संधी असल्याचा दावा व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी केला आहे. रशियाबरोबरील सहकार्यावरून राष्ट्राध्यक्ष बायडेन चीनला तंबी देतील, असे जेन साकी माध्यमांना सांगत आहेत.

अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी अमेरिकी संसदेसमोरील सुनावणीत चीनकडून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना फार मोठ धक्का बसलेला आहे. विशेषतः युक्रेनी जनतेवर रशियाच्या हल्ल्यामुळे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अस्वस्थ झाले आहेत, असे बर्न्स म्हणाले होते. तसेच युक्रेनमधील युद्धामुळे रशिया आणि चीनमध्ये मतभेद निर्माण झाल्याचा दावाही बर्न्स यांनी केला होता. याचा लाभ घेऊन अमेरिकेने रशियापासून चीनला दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, बर्न्स यांनी सुचविले होते.

मात्र चीनने युक्रेन युद्धाबाबत स्वीकारलेली अधिकृत भूमिका बर्न्स करीत असलेल्या दाव्यांपेक्षा फारच वेगळी असल्याचे समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या चर्चेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ही चर्चा सुरू झाल्यानंतरही बराच काळ याचे तपशील माध्यमांसमोर प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. मात्र काही झाले तरी अमेरिकेच्या दबावामुळे उघडपणे रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारणे चीनला शक्य नसल्याचा दावा पाश्‍चिमात्य विश्‍लेषक करीत आहेत. त्याचवेळी अमेरिकेलाही एकाच वेळी रशिया आणि चीनच्या संयुक्त आघाडीला आर्थिक, राजकीय आणि सामरिक पातळीवर संघर्ष पुकारता येणार नाही, असे विश्‍लेषक सांगत आहेत.

leave a reply