डीआरडीओने ४५ दिवसात ‘फ्लाईट कंट्रोल सिस्टिम इंटिग्रेशन संकुल’ उभारले

-संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन ‘एएमसीए’ विमानांवर संशोधन होणार

नवी दिल्ली/बंगळुरू – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते गुरुवारी बंगळुरू येथे सात मजली फ्लाईट कंट्रोल सिस्टिम इंटिग्रेशन (एफसीएस) संकुलाचे उद्घाटन केले. भारतीय बनावटीचे हायब्रिड तंत्रज्ञान वापरून केवळ ४५ दिवसात हे संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलात भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणारा ‘ऍडव्हान्स मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एएमसीए) या अतिप्रगत विमानाच्या संशोधन व विकासावर काम चालणार आहे. यामुळे या संकुलाचे महत्त्व वाढते.

संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एडीए) या प्रयोगशाळेच्या आवारात हे संकुल उभारण्यात आले आहे. हे संकुल उभारण्याकरीत वापरण्यात आलेले तंत्रज्ञान संपूर्णपणे भारतीय आहे. पारंपरिक, प्री-इंजिनियर आणि प्रीकास्ट पद्धतीचा समावेश असलेली हायब्रिड पद्धत यासाठी डीआरडीओने लार्सन ऍण्ड टुब्रोच्या सहाय्याने विकसित केली होती. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केवळ ४५ दिवसात हे संकुल बांधून पूर्ण करण्यात आले.

एखाद्या इमारतीची व प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर त्याचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य एकाच मंत्र्याला याआधी लाभत नव्हते. मात्र आता ते शक्य झाले आहे. हा आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील एक अद्वितीय प्रकल्प असल्याचा दावा यावेळी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला. नवीन भारताच्या नवीन उर्जेचे हे मूर्त स्वरूप असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले.

या संकुलामध्ये लढाऊ विमानांच्या वैमानिकांना सिम्युलेटर प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. हा सिम्युलेटर प्रशिक्षण विभाग संकुलाच्या सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. सिम्युलेटर्स कोणत्याही प्रकारची हानी होऊ न देता चुका करून शिकण्याची संधी वैमानिकांना उपलब्ध करून देते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या इमारतीत आधुनिक विमानशास्त्रावर संशोधन केले जाणार आहे. भारत अतिप्रगत ‘ऍडव्हान्स मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एएमसीए) लढाऊ विमान विकसित करीत आहे. यावर डीआरडीओच्य एडीए प्रयोगशाळेतच काम सुरू आहे. मात्र आता या विमानावर पुढील संशोधन हे या नव्या संकुलामध्ये होईल. पाचव्या पिढीतील अत्याधुनिक विमाने फार थोड्या देशांकडे आहेत. भारताने ते विकसित केले आहे. त्याचा प्रोटोटाईप विकसित करण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. गेल्यावर्षी ‘एएमसीए’ विमानाच्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर या कामाने वेग पकडला आहे. आता ‘एएमसीए’च्या किचकट तंत्रज्ञानातील सुधारणा व इतर यंत्रणांच्या विकासाचे काम या नव्या फ्लाईट कंट्रोल सिस्टिम इंटिग्रेशन (एफसीएस) संकुलामध्ये चालणार आहे.

leave a reply