एलएसीवरील यथास्थिती बदलण्याची संधी चीनला मिळणार नाही

-परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

बंगळुरू – सीमावाद सोडविण्याची इच्छा व क्षमता भारत आणि चीनकडे आहे. अमेरिकेने यात नाक खुपसून आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला बजावले हेोते. अमेरिका सीमावादाची आग भडकवत असल्याचा आरोप करणारा चीन, स्वतःहून ही आग विझवायला तयार नाही, ही बाब भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्षात आणून दिली. 1962 सालानंतर पहिल्यांदाच चीनने एलएसीवर इतक्या मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले आहे, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. पण चीनला एकतर्फी कारवाईद्वारे एलएसीवरील यथास्थिती बदलू दिली जाणार नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी नेमक्या शब्दात बजावले.

jaishankarराष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री जयशंकर बोलत होते. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व युरोपिय देश रशियाच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी भारतावर दबाव टाकत आहे. त्यासाठी भारत व चीनच्या एलएसीवरील परिस्थितीचा दाखला देऊन अमेरिका आणि युरोपिय देशांनी भारताला इशारे दिले होते. मात्र चीनबरोबर निर्माण झालेली समस्या हाताळण्याची धमक भारताकडे आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाश्चिमात्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या उद्गारांचे चीनमध्ये स्वागत होत आहे. सीमावाद सोडविण्याची इच्छा व क्षमता भारत आणि चीनकडे आहे, असे सांगून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी अमेरिकेवर टीका केली होती.

मात्र चीनबरोबरील तणावाचा अमेरिका व युरोपिय देशांना लाभ मिळू देणार नाही, अशी भारताची भूमिका असली तरी, भारत चीनवर पूर्णपणे विश्वास ठेवणार नाही, हे जयशंकर यांनी बंगळुरूमधील कार्यक्रमात दाखवून दिले. कुठल्याही परिस्थितीत एकतर्फी कारवाईद्वारे एलएसीवरील यथास्थिती बदलण्याची परवानगी चीनला मिळणार नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले. एलएसीवरील परिस्थिती बळाचा वापर करून बदलण्याचे गंभीर परिणाम संभवतात, अशा कठोर शब्दात परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला समज दिली. एलएसीवर 1962 सालानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात चीनने लष्करी तैनाती केलेली आहे, ही बाब देखील परराष्ट्रमंत्र्यांनी लक्षात आणून दिली. गेल्या दोन वर्षांपासून एलएसीवर भारताने विकसित केलेल्या पायाभूत सुविधांमुळे इथे तैनात असलेल्या सैनिकांपर्यंत आवश्यक ते सारे सहाय्य सुलभतेने पोहोचत आहे. यामुळे भारतीय सैनिक अधिकच दृढतेने या क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहेत, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले.

‘गेल्या दोन वर्षात देशासमोर चार मोठी आव्हाने खडी ठाकली होती. कोरोनाची साथ, एलएसीवरील चीनबरोबरचा तणाव, अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि युक्रेनचे युद्ध; यामुळे दूरवर घडलेल्या गोष्टींचाही आपल्या सुरक्षेवर थेट परिणाम होऊ शकतो, याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांपुरती मर्यादित आहे, असा समज करून घेण्याचे कारण नाही. देशाची सुरक्षा व समाजाचे क्षेमकुशल आव्हानांमुळे बाधित होऊ नये, ही राष्ट्रीय सुरक्षेची माझी व्याख्या आहे’, असे सूचक उद्गार यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी काढले.

leave a reply