येत्या काळात ‘स्पेस टेक्नॉलॉजी’मधील भारताच्या क्षमतेची जाणीव जगाला होईल

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Modi in Navsariअहमदाबाद – आयटी क्षेत्रातील भारताचे सामर्थ्य सारे जग अनुभवत आहे. पुढच्या काळात भारताच्या अंतराळविषयक क्षमतेची जाणीव जगाला होईल. असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘इंडियन स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर’च्या (इन-स्पेस) अहमदाबादमधील मध्यवर्ती केेंद्राचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी हा विश्वास व्यक्त केला. इन-स्पेसमध्ये देशाच्या अंतराळ क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला. तसेच अंतराळ संशोधनात यापुढे खाजगी उद्योगांनाही संधी मिळेल व लवकरच याबाबतचे धोरण जाहीर केले जाईल, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. पुढच्या काळात स्पेस, अर्थात अंतराळ आणि सी अर्थात सागरी क्षेत्र सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत. आजवर अंतराळ क्षेत्रातील भारताच्या मोहिमा इस्रोकडून राबविल्या जात होत्या व खाजगी क्षेत्राकडे केवळ पुरवठादार म्हणून पाहिले जात होते. पण पुढच्या काळात अंतराळ तंत्रज्ञानाच्या आघाडीवर खाजगी क्षेत्राला मोठी संधी दिली जाईल. मोठ्या संकल्पनांशिवाय मोठे विजेते घडविता येत नाहीत. आपल्या देशात अफाट क्षमता आहे आणि मर्यादित प्रयत्नातून त्याचा पूर्ण वापर होऊ शकत नाही, असे सांगून पंतप्रधानांनी अंतराळ तंत्रज्ञानाच्या आघाडीवर खाजगी क्षेत्राला संधी देण्याच्या योजनेचे समर्थन केले.

केवळ इस्रोच अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करील, बाकीच्यांना याची संधी मिळणार नाही, असे आजच्या काळातील तरुणांना आणि संशोधकांना सांगता येणार नाही. त्यांनाही या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली, तर नव्या संभवना समोर येतील. इन-स्पेस पुढच्या काळात देशाच्या युवावर्गाला आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन करण्याची जबरदस्त संधी देईल. अशी गुणवत्ता लाभलेले तरुण मग इस्रोत काम करीत असो की खाजगी क्षेत्रात, त्याने फरक पडणार नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला.

21 व्या शतकात स्पेस टेक्नॉलॉजी मोठ्या क्रांतीचा आधार बनणार आहे. स्पेस अर्थात स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर दूरवर होणार नाही, तर आपल्यामधील ‘स्पेस’मध्येही अर्थात अंतराळामध्येही याचा वापर होईल, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी मिशन चांद्रयानचा उल्लेख केला. वैज्ञानिक असो वा शेतकरी अथवा मजूर असो, इस्रोची चांद्रयान मोहीम साऱ्या देशवासियांचे मिशन बनले होते. या काळात देशाच्या एकजुटीचे दर्शन सर्वांना झाले, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

leave a reply