रशियाने फिनलँडचा इंधनवायू पुरवठा रोखला

मॉस्को – नाटोत सहभागी होण्याची घोषणा करणाऱ्या फिनलँडला रशियाने जबर धक्का दिला रशियाची राष्ट्रीय इंधन कंपनी गाझप्रोमने फिनलँडचा इंधनवायू पुरवठा रोखला आहे. फिनलँडने ही माहिती दिली असून रशियानेही या बातमीला दुजोरा दिला आहे. आधी पुरवठा करण्यात आलेल्या इंधनाचे बिल फिनलँडने चुकते केलेले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रशियाने दिली. रशियाने केलेल्या नव्या नियमानुसार ग्राहकदेशांना रशियन इंधनाचे बिल रूबलमध्ये चुकते करण्याची सूचना केलेली आहे. इतर युरापिय देशांप्रमाणे फिनलँडने रशियाची ही मागणी अमान्य केली होती.

स्वीडन व फिनलँड हे रशियाच्या प्रभावक्षेत्रातील देश नाटोमध्ये सहभागी होण्याची तयारी करीत आहेत. याचे भयंकर परिणाम संभवतात, याची जाणीव रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी फिनलँडला करून दिली होती. त्याकड दुर्लक्ष करून फिनलँडने नाटोत सहभागी होण्यासाठी पुढाकारघेतला होता. त्यानंतर रशियाने फिनलँडचा इंधनवायू पुरवठा रोखून धरल्याचे दिसत आहे. रशियाच्या मागणीनुसार आधी पुरवठा केलेल्या इंधनाचे बिल रूबलशी निगडीत यंत्रणेद्वारे करण्यास फिनलँडने नकार दिला. त्यामुळे यापुढ फिनलँडला इंधनाचा पुरवठा करता येणार नाही, असे रशियाच्या गाझप्रोमने म्हटले आहे.

2020 साली रशियाने फिनलँडला 1.61 दशलक्ष क्युबिक मीटर्स इतका इंधनवायूचा पुरवठा केला होता. तर 2021 साली याचे प्रमाण सुमारे 1.8 दशलक्ष क्युबिक मीटर्स इतके हेोते. त्यामुळे फिनलँड इंधनवायुसाठी मोठ्या प्रमाणात रशियावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. असे असूनही नाटोत सहभागी होण्याचा निर्णय घेऊन फिनलँडने रशियाला थेट आव्हान देण्याचे धाडस दाखविले. त्याचे गंभीर परिणाम होतील, या रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या इशाऱ्याकडेही फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांनी दुर्लक्ष केले होते.

इंधनासाठी रशियावर अवलंबून असलेले युरोपिय देश रशियन इंधनाला पर्याय शोधत आहेत. मात्र या आघाडीवर युरोपिय देशाना फारसे यश मिळालेले नाही. आपण युरोपसाठी रशियन इंधनाला पर्याय देऊ शकत नाही, असे सांगून आखाती देशांनी आपली समर्थता व्यक्त केली होती. तर युरोपिय देशांनी रशियाचे इंधन नाकारल्यास त्याचा ओघ आशियाई देशांकडे वळवू अशी धमकी रशियाने याआधीच दिलेली आहे. तर रशिया इंधनाचा शस्त्रासारखा वापर करीत असल्याचा आरोप अमेरिका व नाटोकडून केला जात आहे.

leave a reply