देशातील वीजेची मागणी विक्रमी पातळीवर

नवी दिल्ली – भारतातील वीजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. शनिवारी देशभरात वीजेची मागणी १८९.६ गीगावॅट (जीडब्ल्यू) इतकी नोंदविण्यात आली. तीन दिवसांपूर्वी २८ जानेवारीला वीजेच्या मागणीच्या बाबतीत १८८.४ गीगावॅट इतका विक्रम नोंदविला गेला होता. देशात वीजेची मागणी वेगाने वाढत असून सध्याचा वेग पाहता ही मागणी लवकरच २०० गीगावॅटचा टप्पा गाठेल, असा दावा केला जातो. तसेच वीजेची वाढती मागणी ही देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आल्याचेही दर्शवित असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

देशात वीजेची मागणी गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढली आहे. कोरोना व्हायरसमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे वीजेची मागणी प्रचंड घटली होती. देशात आर्थिक व्यवहार आणि उत्पादन ठप्प झाले होते. जुलैनंतर सरकारने सुरू केलेल्या अनलॉक प्रक्रियेनंतर हळूहळू करत कारखाने, व्यवसाय, कंपन्या व इतर उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले. त्यानंतर विजेची मागणी वाढू लागली.

गेल्यावर्षी लॉकडाऊनआधी जानेवारी महिन्यात वीजेची मागणी १७०.९७ गीगावॅटपर्यंत (१ लाख ७० हजार ९७० मेगावॅट) पोहोचली होती. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत वीजेची मागणी १५ ते १८ गीगावॅटने जास्त नोंेदविण्यात येत आहे. २२ जानेवारीला देशातील वीजेच्या मागणीने सर्वात जास्त उच्चांक गाठला होता. ही मागणी १ लाख ८५ हजार ८२० मेगावॅट अर्थात १८५.८२ गीगावॅट इतकी नोंदविण्यात आली होती. मात्र त्यानंतर २८ जानेवारीला हा विक्रम मोडीत निघाला व वीजेचा खप १८८.४ गीगावॅटवर पोहोचला. तर शनिवारी ३० जानेवारीला नवा विक्रम प्रस्थापित झाला असून वीजेची मागणी १८९.६ गीगावॅटपर्यंत पोहोचली.

ज्या वेगाने देशातील वीजेची मागणी वाढत आहे, ते पाहता लवकरच ही मागणी २०० गीगावॅटच्या पुढे जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जाते. देेेशाची वीज निर्मितीची सध्याची क्षमता ३७३.४३ गीगावॅट आहे.

देेशातील वाढत्या वीजेच्या मागणीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला मिळालेल्या गतीचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. दरवर्षी ही मागणी वाढत जात आहे. २०१९ सालात वीजेची मागणी १६८ गीगावॅटपर्यंत पाहोचली होती. वीजेच्या या वाढत्या मागणीने कोरोनाच्या संकटाला दूर सारून आता देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली असून औद्योगिक हालचाली वाढल्याचे दाखवून देत असल्याचे स्पष्ट करणारी ठरते, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. याआधी ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) महसूल विक्रमी पातळीवर पोहोचला होता. देशांतर्गत इंधनाच्या मागणीतही वाढ नोंदविण्यात आली होती. तसेच रेल्वेद्वारे होणारी मालवाहतूकही लॉकडाऊनआधीच्या स्तरापेक्षा पुढे गेल्याची आकडेवारी समोर आली होती. यामध्ये वीजेच्या मागणीने देशाच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा गती पकडल्याचा आणखी संकेत दिल्याचा विश्‍लेषकांचा दावा आहे.

अर्थसंकल्प सादर होण्याआधी केवळ दोन दिवसआधी वीजेच्या मागणीने ही विक्रमी पातळी गाठली आहे. पुढील आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था ११ टक्क्याने विकास करेल, असा निष्कर्ष आर्थिक सर्वेक्षण अहवालात काढण्यात आला होता.

leave a reply