ऑस्ट्रेलियाविरोधातील चीनची दडपशाही इतर देशांसाठी ‘वेक-अप कॉल’

- ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांचा इशारा

‘वेक-अप कॉल’कॅनबेरा/बीजिंग – ‘चीनची आर्थिक भरभराट झाली तर तो अधिक मुक्त व लोकशाहीवादी देश बनेल, अशी धारणा यापूर्वी होती. मात्र वास्तवात तसे घडले नाही. ९०च्या दशकात चीनची अर्थव्यवस्था अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या १० टक्के इतकी होती. आज चीनची अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात वाढली असून त्याचा वापर चीनची राजवट इतर देशांवर दडपण टाकण्यासाठी करीत आहे’, असा आरोप ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी केला. चीनने राबविलेल्या दडपशाहीच्या धोरणाचे ऑस्ट्रेलिया हे ठळक उदाहरण असून जगातील इतर देशांसाठी हा ‘वेक-अप कॉल’ असल्याचे ट्रुस यांनी यावेळी बजावले.

ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस व संरक्षणमंत्री बेन वॉलेस ‘टू प्लस टू’ बैठकीसाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियातील अभ्यासगट ‘लोवी इन्स्टिट्यूट’मध्ये झालेल्या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री ट्रुस यांनी चीनला लक्ष्य केले. ‘ऑस्ट्रेलिया किंवा लिथुआनियासारख्या देशाच्या उत्पादनांना चीनकडून रोखले जात असून त्याविरोधात ब्रिटन आपल्या सहकारी देशांच्या सहकार्याने आवाज उठवेल. चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात चालवलेली आर्थिक दडपशाही हे जगातील इतर देशांना खडबडून जागे करणारे उदाहरण आहे. इतर देशांवर दबाव टाकण्यासाठी चीन आपल्या आर्थिक बळाचा वापर कसा करतो, हे ऑस्ट्रेलियाविरोधातील कारवायांवरून दिसून येते’, याकडे ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

‘वेक-अप कॉल’गेल्या काही वर्षात ब्रिटन व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांबरोबरील चीनचे संबंध चांगलेच चिघळले आहेत. ५जी तंत्रज्ञान, कोरोनाची साथ, साऊथ चायना सी, तैवान, हॉंगकॉंग यासारख्या अनेक मुद्यांवरून चीन व या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या दादागिरीविरोधात हे दोन देश एकत्र येत असल्याचे गेल्या काही महिन्यांमध्ये समोर येत आहे.

ब्रिटनने ऑस्ट्रेलियाबरोबर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. त्याचवेळी ब्रिटनने ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ऍबट यांची विशेष व्यापार सल्लागार म्हणून नियुक्तीही केली आहे. चीनविरोधातील ‘ऑकस डील’अंतर्गत ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या देण्याची तयारीही ब्रिटनने दर्शविली आहे.

leave a reply