रशियाने इराणला अंतरिम अणुकरारासाठी प्रस्ताव दिला

- अमेरिकी वृत्तवाहिनीचा दावा

अंतरिमन्यूयॉर्क – गेल्या काही महिन्यांपासून व्हिएन्ना येथील वाटाघाटींमध्ये अडकलेला अणुकरार मार्गी लावण्यासाठी रशियाने इराणला अंतरिम अणुकराराचा प्रस्ताव दिला. यानुसार रशियाने इराणसमोर निर्बंधातून सवलत देण्याचा पर्याय ठेवला. पण इराणने रशियाचा हा प्रस्ताव धुडकावल्याची माहिती अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने दिली. त्याचबरोबर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला रशियाने इराणला दिलेल्या या प्रस्तावाची माहिती असल्याचा दावाही या वृत्तवाहिनीने केला आहे.

रशियाने दिलेल्या अंतरिम अणुकराराच्या प्रस्तावानुसार, इराणला आपल्या अणुकार्यक्रमातील युरेनिअमचे संवर्धन ६० टक्क्यांवर थांबवावे लागेल. २०१५ सालच्या अणुकरारात ही मर्यादा फारच कमी होती. त्याचबरोबर इराणने आत्तापर्यंत संवर्धित केलेला युरेनिअमचा साठा नष्ट करावा, अशी अट रशियाने या प्रस्तावात ठेवल्याची माहिती अमेरिकेच्या सरकारी सूत्रांनी ‘एनबीसी’ या वृत्तवाहिनीला दिली. या व इतर मागण्या मान्य केल्यास इराणवरील निर्बंध शिथिल केले जातील. तसेच परदेशी बँकांमध्ये अडकलेला इराणचा अब्जावधी डॉलर्सचा इंधन महसूल मोकळा केला जाईल, असा प्रस्ताव रशियाने दिल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

पण इराणने रशियाचा हा प्रस्ताव धुडकावल्याचे अमेरिकी वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. यामागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण बायडेन प्रशासनाला रशियाने इराणला दिलेल्या या प्रस्तावाची माहिती असल्याचेही या सरकारी सूत्रांनी वृत्तवाहिनीला सांगितले. चार दिवसांपूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी रशियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली होती. या भेटीत रशियन राष्ट्राध्यक्षांनी इराणला हा प्रस्ताव दिल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

अंतरिमबायडेन प्रशासनाने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण शुक्रवारी जीनिव्हा येथे पार पडलेल्या बैठकीत, रशियाने अणुकरारासाठी इराणवर दबाव टाकावा, असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केले. रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी इराणवर दडपण टाकण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले आहे.

२०१५ सालचा अणुकरार पुनर्जीवित करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका व इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. अणुकरारात सामील होण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर अटी ठेवल्या आहेत. अमेरिकेने इराणवरील सर्व निर्बंध मागे घ्यावेत. तसेच येत्या काळात बायडेन प्रशासन किंवा अमेरिकेचा कुठलाही राष्ट्राध्यक्ष पुन्हा या अणुकरारातून बाहेर पडणार नाही, याची लिखित कबुली द्यावी, अशी मागणी इराणने केली आहे. याशिवाय इराणने आपल्या अणुकार्यक्रमात फार मोठे बदल करणार नसल्याचे ठणकावले होते. दरम्यान, अमेरिका व इराणमध्ये छुपा अणुकरार झाल्याचा दावा ब्रिटनमधील अरबी वृत्तसंस्थेने काही दिवसांपूर्वीच केला होता.

leave a reply