सौदी, युएईने ‘मुस्लिम ब्रदरहूड’ला दहशतवादी घोषित केले

दुबई/दोहा – ‘मुस्लिम ब्रदरहूड’ ही दहशतवादी संघटना आहे, अशी घोषणा सौदी अरेबियाच्या धार्मिक संघटनेने केली. तर ‘संयुक्त अरब अमिराती’च्या (युएई) फतवा कौंसिलने देखील सौदीच्या या निर्णयाचे समर्थन करून दहशतवादी कारवायांना चिथावणी देणार्‍या ‘मुस्लिम ब्रदरहूड’पासून दूर रहा, असा संदेश दिला आहे. सौदी व युएईच्या या निर्णयावर कतारमधील ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ मुस्लिम स्कॉलर्स’ने (आययुएमएस) टीका केली असून हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका ठेवला आहे. सौदी अरेबियातील धार्मिक घडामोडींवर महत्त्वाचे निर्णय घेणार्‍या ‘कौंसिल ऑफ सिनिअर स्कॉलर्स’ (सीएसएस) या संघटनेने काही दिवसांपूर्वी महत्त्वाची घोषणा केली होती. ‘सीएसएस’चे प्रमुख आणि सौदी अरेबियाचे ‘ग्रँड मुफ्ती’ असलेले ‘शेख अब्दुलअझिझ बिन अब्दुल्लाह अल-शेख’ यांनी ‘मुस्लिम ब्रदरहूडचा इस्लामशी काहीही संबंध नसून हा एक भरकटलेला गट आहे’, असे जाहीर केले. ‘मुस्लिम ब्रदरहूड, अल-नुस्र आणि अल कायदा या संघटना तरुणांमध्ये विष कालवतात, मर्यादांचे उल्लंघन करतात, पैशाची लूट करतात. जे कुणीही या संघटनांमध्ये सहभागी झाले असतील, ते सन्मार्गापासून भरकटले आहेत, त्यांनी मोठी चूक केली आहे’, अशी टीका ग्रँड मुफ्ती शेख अब्दुलअझिझ यांनी केली.

यानंतर पुढच्या काही तासातच ‘सीएसएस’ने मुस्लिम ब्रदरहूड दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले. मुस्लिम ब्रदरहूड ही संघटना संबंधित देशांमधील राजवटीच्या विरोधात उठाव करण्यासाठी चिथावणी देऊन हिंसाचार घडवून अस्थैर्य माजविते, असा आरोप ‘सीएसएस’ने केला. या संघटनेला धर्माशी काही देणेघेणे नसून फक्त संबंधित देशांमधील सत्ता काबिज करणे हेच या संघटनेचे ध्येय असल्याचे ‘सीएसएस’ने म्हटले आहे. पुढे सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘सीएसएस’चे सदर आवाहन सोशल मीडियावर पोस्ट केले. सौदी अरेबियाच्या या भूमिकेचे ‘युएई’ने स्वागत केले आहे.

मुस्लिम ब्रदरहूड
इस्लामधर्मियांची धार्मिक, राजकीय, सामाजिक चळवळ म्हणून १९२८ साली इजिप्तमध्ये ‘हसन अल-बन्ना’ यांनी कट्टरपंथी ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या संघटनेची स्थापना केली. इजिप्तमध्ये या संघटनेचा सर्वाधिक प्रभाव असला तरी गेल्या नऊ दशकांहून अधिक काळात या संघटनेने अरब-आखाती देशांबरोबरच अमेरिका, युरोप, आशिया तसेच लॅटिन अमेरिकी देशांमध्ये देखील पाय पसरले आहेत. २०११ साली इजिप्तमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत मुस्लिम ब्रदरहूड सत्तेवर आली व राष्ट्राध्यक्ष म्हणून मोहम्मद मोर्सी यांची निवड झाली. पुढे वर्षभरातच लष्कराने उठाव करून मोर्सी व मुस्लिम ब्रदरहूडची सत्ता उधळून लावली. इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा करणार्‍या या संघटनेने आत्मघाती हल्ल्यांचे समर्थन केले आहे.

सध्या जगाला भेडसावत असलेल्या कोरोनाव्हायरसच्या विषाणूंचा वापर करून इजिप्त तसेच पाश्‍चिमात्य देशांवर हल्ले चढवा, अशी चिथावणी काही महिन्यांपूर्वीच या संघटनेच्या समर्थकाने दिली होती. तर ही संघटना फ्रान्समध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा इशारा वर्षभरापूर्वी फ्रान्समधील विश्‍लेषक व पत्रकारांनी दिला होता. फ्रान्सच नाही तर मुस्लिम ब्रदरहूड युरोपमध्ये खिलाफत प्रस्थापित करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी दिला होता.

दरम्यान, रशियाने फार आधीच ‘मुस्लिम ब्रदरहूड’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘मुस्लिम ब्रदरहूड’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. त्याआधी अमेरिकेने मुस्लिम ब्रदरहूडवर कारवाई केली नव्हती. अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर जॉन मॅक्कॅन हे मुस्लिम ब्रदरहूडचे ‘गॉडफादर’ असल्याचा आरोप इजिप्तच्या वृत्तवाहिनीचा सूत्रसंचालक अहमद मुस्सा यांनी केला होता.

सौदीप्रमाणे ‘युएई’च्या धार्मिक गटाने देखील मुस्लिम ब्रदरहूड दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले आहे. ‘मुस्लिम ब्रदरहूड’चा दहशतवादी संघटनांना असलेला पाठिंबा, या संघटनेची विवादास्पद भूमिका तिला दहशतवादी संघटना ठरविण्यासाठी पुरेशी असल्याचे ‘युएई’च्या फतवा कौंसिलने स्पष्ट केले. त्याचबरोबर जनतेने या संघटनेपासून अंतर ठेवावे, संबंध ठेवू नये, असे ‘फतवा कौंसिल’ने बजावले आहे. मुस्लिम ब्रदरहूडला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या सौदीच्या या निर्णयाचे इस्रायलने देखील समर्थन केले. याआधी २०१४ साली सौदी अरेबियाने ‘मुस्लिम ब्रदरहूड’ला काळ्यात यादीत टाकले होते.

सौदी व ‘युएई’च्या या निर्णयावर ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ मुस्लिम स्कॉलर्स’ (आययुएमएस) या कतारस्थित संघटनेने टीका केली आहे. सौदीचा फतवा हा या संघटनेची बदनामी करण्यासाठी असल्याची टीका ‘आययुएमएस’ने केली. त्याचबरोबर ‘मुस्लिम ब्रदरहूड’ संघटनेचा दहशतवादाशी संबंध नसून यासंबंधी कुठलाही पुरावा नसल्याचा दावा ‘आययुएमएस’ने केला. ‘आययुएमएस’ ही ‘मुस्लिम ब्रदरहूड’शी संलग्न संघटना मानली जाते. ‘आययुएमएस’च्या विश्‍लेषकांनी याआधी दहशतवाद्यांच्या आत्मघाती हल्ल्यांचे समर्थन केले होते. सौदी, युएई, बाहरिन आणि इजिप्त याआधीच ‘आययुएमएस’ला देखील दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

leave a reply