आफ्रिकेच्या साहेल भागात फ्रान्सची लष्करी कारवाई

- ड्रोन हल्ल्यात 40 दहशतवादी ठार

साहेलनियामी – आफ्रिकेच्या साहेल भागात फ्रान्सच्या लष्कराने दहशतवादविरोधात मोहीम छेडली आहे. फ्रान्सच्या लष्कराने नायजेर आणि बुर्किना फासोच्या सीमेजवळ चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात जवळपास 40 दहशतवाद्यांना ठार केले. तर माली आणि बुर्किना फासोमध्ये दहशत निर्माण करणारा ‘आयएस’संलग्न दहशतवादी संघटनेच्या नेत्याला फ्रेंच लष्कराने ताब्यात घेतले.

‘ऑपरेशन बरखाने’ अंतर्गत फ्रान्सचे लष्कर आफ्रिकेच्या साहेल भागात दहशतवादविरोधात कारवाई करीत आहेत. याआधी फ्रान्सच्या लष्कराने आफ्रिकेतील कारवाईत ड्रोन्सचा वापर केला होता. पण पहिल्यांदाच दहशतवादविरोधी मोहिमेत ड्रोन्सच्या हल्ल्यात एवढे मोठे यश मिळाल्याचा दावा फ्रेंच लष्कराने केला. ही कारवाई फ्रान्ससाठी मोठे धोरणात्मक यश असल्याचे फ्रेंच लष्कराने म्हटले आहे. नायजेर आणि फ्रान्सच्या लष्कराने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

या आठवड्याच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नायजेरच्या आठ जवानांचा बळी गेला होता. त्याला उत्तर देण्यासाठी नायजेर आणि फ्रेंच लष्कराने संयुक्तरित्या ही कारवाई केली. याला काही तास उलटत नाही तोच, फ्रेंच लष्कराने माली आणि बुर्किना फासोमध्ये आयएस संलग्न दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. यामध्ये आयएससंलग्न संघटनेचा नेता ओमेया उल्द अल्बाकाये याला अटक केल्याचे फ्रेंच लष्कराने जाहीर केले.

leave a reply