म्यानमारमधील भारतविरोधी दहशतवाद्यांना चीनचे सहाय्य

- भारतीय अधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली – भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या म्यानमारमधील दहशतवाद्यांना चीनकडून सहाय्य पुरविले जात आहे. या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे व आश्रय देऊन चीन त्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप भारताच्या अधिकाऱ्यांनी केला. या अधिकाऱ्यांची नावे उघड झालेली नसली तरी माध्यमांमध्ये याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून चीनलाही यावर खुलासा देणे भाग पडल्याचे दिसत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला देश दुसऱ्या देशात हस्तक्षेप करीत नाही, असे जाहीर केले आहे.

चीनचे सहाय्य

भारत-म्यानमार सीमेवर सक्रीय असलेल्या ‘युनायटेड वा स्टेट आर्मी’ आणि ‘अराकान आर्मी’ या दहशतवादी संघटना भारताच्या सुरक्षेला आव्हान देत आहेत. या दहशतवादी संघटना म्यानमारच्या भूमीचा वापर करून भारताला लक्ष्य करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आल्या आहेत. म्यानमारच्या सरकारने या दहशतवादी संघटनांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन भारताला दिले होते. मात्र या दहशतवादी संघटनांच्या मागे चीनचे पाठबळ असल्याची बाब वारंवार समोर येत आहे.

या दहशतवादी संघटनांचे म्होरके असलेले चारजण चीनच्या कुनमिंग शहरात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेत असल्याचे बोलले जाते. चार चारजणांमध्ये तीन नागा बंडखोर संघटनांशी संबंधित असल्याची माहितीही उघडझाली आहे. चीनचे निवृत्त लष्करी अधिकारी या चौघांना प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे भारताला लक्ष्य करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचे भरणपोषण व प्रशिक्षण चीनकडून सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांकडून पश्‍चिम सीमेवर घातपात घडविण्याची कारस्थाने हाणून पडाण्याची आव्हान भारतीय सुरक्षा दलांसमोर होते. आता ईशान्येकडील सीमेवरही तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा कट चीनने आखला आहे.

भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचे चीनने खंडन केले आहे. आपला देश दुसऱ्या देशात हस्तक्षेप करीत नाही, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. चीनने दहशतवाद्यांना शस्त्रे पुरविलेली नाही, असे सांगताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला देश शस्त्रास्त्रांची निर्यात करताना नेहमीच जबाबदार भूमिका पार पाडत आला आहे. चीन केवळ सार्वभौम देशांनाच शस्त्रास्त्रे पुरवितो, कुठल्याही संघटनेला चीनकडून शस्त्रे पुरविली जात नाहीत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये अस्थैर्य माजविण्यासाठी चीन कारस्थाने आखत असल्याची बाब याआधीही समोर आली होती. आसाम तसेच ईशान्येकडील इतर राज्यांमध्येही घातपात घडविणाऱ्या उल्फाच्या मोठ्या दहशतवाद्यांना चीनने सहाय्य पुरविले होते. तसेच उल्फाचे काही नेते चीनमध्येच असल्याचे अनेकवार उघड झाले होते. बांगलादेशमध्ये पंतप्रधान शेख हसिना यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर, या सरकारने भारतविरोधी दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई सुरू केली होती. त्यानंतर चीनने उल्फा व ईशान्येकडील अन्य राज्यांमधील इतर दहशतवादी तसेच बंडखोर संघटनांना आश्रय दिला होता.

मात्र लडाखमध्ये सीमावाद पेटल्यानंतर चीनकडून या दहशतवाद संघटनांचा अधिक आक्रमकपणे वापर केला जाण्याची शक्यता बळावली आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी चीनवर केलेल्या आरोपांमागे ही पार्श्‍वभूमी असल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply