दिल्लीत चकमकीनंतर पाच दहशतवाद्यांना अटक

- ‘आयएसआय’चा कट उघड

नवी दिल्ली – सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शकरपूर भागातून थरारक पाठलाग आणि चकमकीनंतर पाच दहशतवाद्यांना अटक केली. ऑक्टोबर महिन्यात पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यात शौर्यचक्र विजेते बलविंदरसिंग भिखीविंड यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या खलिस्तानी दहशतवाद्यांनी घडवून आणली होती. या हत्येत यातील दोन दहशतवाद्यांचा समावेश होता. तर तिघे दहशतवादी जम्मू-काश्‍मीरचे असून ‘हिजबुल मुजाहिद्दीन’चे ओव्हर ग्राउंड वर्कर असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ यामागे असून जम्मू-काश्‍मीर आणि खलिस्तानी दहशतवाद्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच ‘आयएसआय’ अमली दहशतवादालाही हवा देत आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाचे उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली.

दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर शकरपूरमध्ये एका वाहनाचा पाठलाग करून पाच दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकही उडली. मात्र आपण पूर्णत: वेढले गेले अहोत हेे लक्षात आल्यावर या दहशतवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, दोन किलो हेरॉईन आणि 1 लाख रुपये जप्त करण्यात आले. पकडण्यात आलेले दोघे जण पंजाबमधील असून तिघे काश्‍मीरमधील आहेत.

या प्रकरणात दोन निरनिराळे घटक आहेत. यामध्ये एक काश्‍मीरचा दहशतवाद आहे. तर हत्या घडवून आणणारे, अमली पदार्थांची तस्करी व टेरर फंडिंगमध्ये सहभागी असलेल्या पंजाबमधील गँगस्टर हा दुसरा घटक असल्याचे पोलीस उपायुक्त कुशवाह यांनी सांगितले. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय काश्‍मीरचा दहशतवाद आणि खलिस्तानी दहशतवादाला जोडू पाहत असल्याचे या अटकेतून समोर येत आहे, असा दावा कुशवाह यांनी केला. तसेच गँगस्टरकडून काही विशिष्ट प्रभावशाली व्यक्तींच्या हत्या घडवून समाजात तेढ माजविण्याचाही कट यामागे असल्याचे कुशवाह म्हणाले.

पकडण्यात आलेल्या पाच दहशतवाद्यांपैकी गुरुजीत सिंग भूरा आणि सुखदीप हे ऑक्टोबर महिन्यात तरणतारणमध्ये शौर्यचक्र विजेते बलविंदरसिंग भिखीविंड यांच्या हत्येत सहभागी होते. 1980 ते 90 च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद पेटलेला असताना बलविंदरसिंग आणि त्यांच्या कुटुंबिय या दहशतवाद्यांविरोधात खडे ठाकले होते. यामुळे बलविंदरसिंग आणि त्यांच्या कुटुंबियांची हिम्मत पाहून या भागातील नागरिकही दहशतवादाविरोधात पुढे आले होते. याआधी बलविंदरसिंग यांच्यावर कित्येक वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

बलविंदरसिंगच्या हत्येत सहभागी असलेले गुरुजीत सिंग भूरा आणि सुखदीप हे दोघे आखाती देशात सुखमित नावाच्या व्यक्तीच्या आणि काही गँगस्टर्सच्या संपर्कात होते. सुखमित आणि या गँगस्टर्सचा संबंध ‘आयएसआय’शी असल्याचे समोर आल्याचे उपायुक्त कुशवाह यांनी सांगितले. मात्र कुशवाह यांनी या गँगस्टर्सच्या नावांचा खुलासा केला नाही.

तसेच ‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या ज्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली ते सुद्धा पीओकेमध्ये आयएसआयच्या हस्तकाच्या संपर्कात होते, अशी माहिती कुशवाह यांनी दिली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त कुशवाह म्हणाले.

leave a reply