अमेरिकी विनाशिकेच्या गस्तीनंतर चीनच्या विमानवाहू युद्धनौकेचा तैवानच्या सामुद्रधुनीतून प्रवास

बीजिंग/तैपेई – अमेरिकेच्या विनाशिकेने तैवानच्या सामुद्रधुनीतून गस्त घातल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या अवधीत चीनची विमानवाहू युद्धनौका ‘कॅरिअर ग्रुप’सह या क्षेत्रात दाखल झाल्याचे समोर आले. चीनची नवी विमानवाहू युद्धनौका ‘शॅन्डाँग’ने ग्रुपमधील इतर युद्धनौकांसह रविवारी तैवानच्या सागरी हद्दीनजिकच्या क्षेत्रातून प्रवास केल्याची माहिती चिनी नौदलाने दिली. हा प्रवास सुरू असतानाच चीनच्या दोन लष्करी विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप तैवानी यंत्रणांनी केला आहे.

शनिवारी, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने सज्ज असलेली ‘युएसएस मस्टिन’ या विनाशिकेने तैवानच्या सामुद्रधुनीतून गस्त घातली होती. अमेरिकी विनाशिकेवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने आपली विनाशिका व लढाऊ विमाने मागे धाडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासात चीनची नवी विमानवाहू युद्धनौका ‘शॅन्डाँग’ आपल्या ‘कॅरिअर ग्रुप’सह तैवाननजिक दाखल होणे लक्ष वेधून घेणारे ठरते. ‘शॅन्डाँग’ आपल्या ताफ्यातील युद्धनौकांसह ‘साऊथ चायना सी’मध्ये सराव करणार असल्याची माहिती चिनी नौदलाने दिली.

तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. तैवानचा ताबा मिळविण्यासाठी चीनने लष्करी कारवाईच्या धमक्याही दिल्या आहेत. चीनच्या या धमक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणात संरक्षणसहकार्य पुरविले असून, अमेरिकी युद्धनौकांचा तैवाननजिकचा वावरही वाढविण्यात आला आहे. यामुळे चीन अधिकच अस्वस्थ झाला असून तैवानवरील दडपण वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

गेल्या महिन्यातच चीनच्या लढाऊ व बॉम्बर विमानांनी तब्बल २६ वेळा तैवानच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले होते. आता थेट विमानवाहू युद्धनौका धाडून चीनने आपल्या कारवाया अधिकच वाढविण्याचे संकेत दिले आहेत. रविवारी विमानवाहू युद्धनौका प्रवास करीत असतानाच चीनच्या ‘वाय-८ अँटी सबमरिन वॉरफेअर प्लेन’ व ‘शांक्सी वाय-८ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर एअरक्राफ्ट’ने तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे.

leave a reply