ब्रिटनपाठोपाठ पाच देशांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने जगभरात खळबळ

- शेअरबाजार कोसळले, विमानप्रवासावर बंदी

लंडन – ब्रिटनपाठोपाठ जगातील पाच देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) आढळल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. विषाणूचा नवा प्रकार मूळ विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने फैलावत असल्याची माहिती समोर आल्याने साथीची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या भीतीच्या पार्श्‍वभूमीवर युरोप व आशियातील शेअरबाजार कोसळले असून ६० अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनमध्ये विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर गेल्या २४ तासात जगातील सुमारे ३२ देशांनी ब्रिटनमधून येणार्‍या विमानांवर बंदी घातली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा वेगाने फैलाव होत असून रविवारी ३५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णांमध्ये तब्बल ९४ टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी २४ तासांच्या अवधीत कोरोनाच्या साथीत ३२६ जणांचा बळी गेला असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल १२६ टक्क्यांची वाढ दिसून आली. ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाख, ४० हजार, १४७ वर गेली असून ६७,४०१ जणांचा मृत्यू झाला आहे. साथीच्या या वाढत्या वेगामागे विषाणूचा नवा प्रकार कारणीभूत असल्याचे मानले जाते. साथीचा फैलाव नियंत्रणाबाहेर चालल्याची भीती ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार ब्रिटनबाहेर फैलावण्यास सुरुवात झाल्याचेही समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नेदरलॅण्ड, डेन्मार्क, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया व इटलीमध्ये विषाणूचा नवा प्रकार आढळल्याची माहिती उघड झाली. फ्रान्स व नॉर्दर्न आयर्लंडमध्येही नवा प्रकार दाखल झाल्याची भीती स्थानिक यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या वाढत्या फैलावाचे तीव्र पडसाद युरोप व आशियातील शेअरबाजारात उमटले आहेत.

सोमवारी ब्रिटनचा प्रमुख शेअर निर्देशांक ‘एफटीएसई १००’ २.६ टक्क्यांनी कोसळला. जर्मनी, फ्रान्स व स्पेनमधील शेअरबाजारांमध्येही दोन ते तीन टक्क्यांची घसरण झाली असून ब्रिटीश पौंडही १.८ टक्क्यांनी खाली आहे. जपानमधील प्रमुख शेअर निर्देशांक निक्केईमध्येही ०.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे प्रमुख कंपन्या व गुंतवणूकदारांना ६० अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसल्याचे सांगण्यात येते. शेअरबाजारापाठोपाठ हवाईक्षेत्र व पर्यटन क्षेत्रालाही मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची व्याप्ती वाढल्याचे समोर आल्याने जगातील प्रमुख देशांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. युरोपमधील २१ देशांसह एकूण ३२ देशांनी ब्रिटनमधून येणार्‍या विमानांवर बंदी जाहीर केली आहे. फ्रान्सने विमानांव्यतिरिक्त ब्रिटनमधून फ्रान्समध्ये येणारी इतर वाहतुकही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी युरोपिय महासंघाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली असून ब्रिटनमधून फैलावणार्‍या कोरोनाच्या साथीबाबत एकत्रित निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येते. कोरोना साथीचा वाढता फैलाव रोखण्यासाठी ब्रिटनने जाहीर केलेल्या नव्या लॉकडाऊनमुळे रिटेल क्षेत्राला सुमारे नऊ अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा ब्रिटीश उद्योजकांच्या गटाने दिला आहे.

leave a reply