फिलिपाईन्समध्ये अण्वस्त्रे आढळल्यास अमेरिकन लष्कराची हकालपट्टी करू

- फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला इशारा

मनिला – ‘अमेरिकेने फिलिपाईन्समधील लष्करी तळावर अण्वस्त्रे तैनात केल्याचे आढळले तर त्याक्षणी अमेरिकन लष्कराला देशाबाहेर हाकलून लावले जाईल’, असा इशारा फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी दिला. गेल्या काही आठवड्यांपासून फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या सैन्यतैनातीवर नाराज आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी अमेरिकेला लष्करी तळ वापरण्यासाठी भाडे द्यावे लागेल, असे बजावले होते.

फिलिपाईन्सच्या पॅसे येथील विलामोर हवाईतळावर आंतरराष्ट्रीय माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी अमेरिकेच्या सैन्यतैनातीबाबत आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली. फिलिपाईन्सचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून यावर अमेरिका किंवा चीन किंवा इतर कुणाचाही प्रभाव नाही. त्यामुळे फिलिपाईन्समध्ये अमेरिकेचे लष्करी तळ असला तरी या तळावर अण्वस्त्रांचा साठा किंवा तैनाती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी दिला.

‘‘अमेरिकेने आमच्या देशातील सैन्यतैनातीच्या आड लष्करी तळांवर अण्वस्त्रांचा साठा केलेला असल्याची पक्की माहिती हाती येईल, त्यादिवशी अमेरिकी जवानांना देशाबाहेर काढले जाईल. त्याचबरोबर अमेरिकेबरोबरील ‘व्हिजिटिंग फोर्सेस अग्रीमेंट’ या लष्करी करारातूनही माघार घेण्यात येईल’’, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते धमकावले. ‘चीनशी शत्रूत्व नको, म्हणून फिलिपाईन्स अमेरिकेच्या अण्वस्त्रतैनातीला विरोध करीत आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. पण भविष्यात अशा अण्वस्त्रांची आपल्या देशात तैनातीच नको, म्हणून ही भूमिका स्वीकारली आहे’, असेही दुअर्ते यांनी स्पष्ट केले.

‘याआधीच फिलिपाईन्सने अमेरिकेला नौदल आणि हवाईतळासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. येत्या काळात अमेरिका-चीन यांच्यात वितुष्ट निर्माण झाले तर पहिला हल्ला फिलिपाईन्सवर होऊ शकतो. हे लक्षात घेऊन फिलिपाईन्सच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र परराष्ट्र धोरण स्वीकारणार आहे’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी केली. दोन आठवड्यांआधी राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी आपल्या देशातील लष्करी तळावरून अमेरिकेला इशारा दिला होता.

दोन दशकांपूर्वी अमेरिका आणि फिलिपाईन्समध्ये झालेले संरक्षण सहकार्य टिकवायचे असेल तर अमेरिकेला लष्करी तळांचा वापर करण्यासाठी फिलिपाईन्सला याचे भाडे द्यावे लागेल, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते म्हणाले होते. त्यानंतर अमेरिकेच्या प्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. तसेच ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या अरेरावीपासून अमेरिका आपला मित्रदेश असलेल्या फिलिपाईन्सची सुरक्षा करील, असे आश्‍वासन बायडेन प्रशासनाने दिले होते.

दरम्यान, फिलिपाईन्समधील अमेरिकेचे लष्करी तळ व येथील अमेरिकेच्या लष्कराची तैनाती हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दुअर्ते यांनी फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकेला सदर तळ रिकामे करण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

leave a reply