भारताच्या सॅटेलाईट यंत्रणेवर चीनचे सायबर हल्ले – अमेरिकास्थित अभ्यासगटाची माहिती

वॉशिंग्टन – लडाख ते अरुणाचल प्रदेशच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ कारस्थाने रचणार्‍या, हिंदी महासागरात आव्हान देणार्‍या चीनने अंतराळातही भारताविरोधात नवी आघाडी उघडली होती, असे समोर येत आहे. २००७ ते २०१८ साला दरम्यान चीनने भारताच्या सॅटेलाईट कम्युनिकेशन्सवर सायबर हल्ले चढविले होते. चीनच्या अंतराळातील घडामोडींवर नजर ठेवून असलेल्या अमेरिकी अभ्यास गटाने या कारवायांचा पर्दाफाश केला. मात्र भारताची उपग्रह यंत्रणा व संबंधित उपकरणे कुठल्याही प्रकारच्या सायबर हल्ल्यांमुळे बाधित झाली नसल्याचे इस्रोच्या प्रमुखांनी स्पष्ट केले.

सायबर हल्ले

अमेरिका स्थित ‘चायना एरोस्पेस स्टडीज इन्स्टिट्यूट’ या अभ्यास गटाने चीनच्या अंतराळातील हालचाली व कारवायांबाबत १४२ पानी अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये, भारताची अंतराळ मोहीम आणि सुरक्षा खिळखिळी करण्यासाठी चीनने केलेल्या १३ वर्षांच्या कारवायांचा पाढा मांडला आहे. २०१२ ते २०१८ या कालावधीत चीनमधून भारतीय सॅटेलाईट व संबंधित यंत्रणांवर सातत्याने सायबर हल्ले झाल्याचे सदर अहवालात म्हटले आहे. मात्र, या अहवालात केवळ २०१२ सालच्या सायबर हल्ल्याबाबत विस्ताराने सांगण्यात आले आहे. २०१२ साली ‘जेट प्रोपल्शन लॅबोरटरी’वर (जेपीएल) चिनी नेटवर्कच्या कॉम्प्युटरमधून सायबर हल्ले झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सायबर हल्ल्याने ‘जेपीएल’ नेटवर्कवर पूर्ण नियंत्रण मिळवले होते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

या सायबर हल्ल्यामध्ये भारताच्या ‘जेपीएल’चे किती नुकसान झाले हे यात स्पष्ट झालेले नाही. पण या अहवालात ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चे (इस्त्रो) प्रमुख के. सिवन यांची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारताच्या सॅटेलाईट कम्युनिकेशन्सवर सायबर हल्ल्यांचा कायमच धोका असतो. मात्र, आजवर या सिस्टिमवर कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवलेला नाही. अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांनी बाधित होऊ नये, यासाठी इस्रोकडे स्वतंत्र आणि इंटरनेटशी संपर्कात नसलेली आयसोलेटेड यंत्रणा असल्याचे इस्रोच्या प्रमुखांनी सांगितले. इस्रोचे प्रोपल्शन काँप्लेक्स तमिळनाडूच्या महेंद्रगिरी येथे असून या ठिकाणी सॅटेलाईटमध्ये वापरल्या जाणार्‍या लिक्वीड, क्रायोजेनिक आणि सेमी क्रायोजेनिक इंजिन्सची चाचणी केली जाते. साधारण दोन वर्षांपूर्वी या ‘जेपीएल’बाबत अमेरिकेची नासा व भारताच्या इस्रोमध्ये विशेष सहकार्य करार झाला होता.

अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालानुसार, चीनजवळ मोठ्या प्रमाणावर काउंटर स्पेस तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ आपल्या शत्रू देशाच्या अंतराळातील यंत्रणेला जमिनीवरुन ‘जियोसिंक्रोनस ऑर्बिट’पर्यंत लक्ष्य करू शकते. त्याचबरोबर शत्रूदेशाचे सॅटेलाईट्स निकामी करण्याचे तंत्रज्ञानही चीनकडे असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. दीड वर्षापूर्वीच भारताने आपली अंतराळ मोहिम आणि उपग्रहांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपग्रहभेदी अर्थात ‘अॅन्टी सॅटेलाईट’ची (ए-सॅट) चाचणी केली होती. या चाचणीनंतर भारताकडे शत्रूच्या उपग्रहांना निष्क्रिय करण्याच्या ‘कायनेटिक किल’ या तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. भारताच्या या सज्जतेचे इतर देशांनी स्वागत केले होते, तर चीनने यावर टीका केली होती. याआधी २००७ साली चीनने सर्वप्रथम उपग्रहभेदी क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करुन अंतराळातील आपला निकामी उपग्रह भेदला होता. चीनच्या या कारवाईमुळे अंतराळातील उपग्रहांची सुरक्षा धोक्यात आल्याची टीका जगभरातून झाली होती.

leave a reply