चीनच्या विस्तारवादाविरोधात नेपाळच्या जनतेची तीव्र निदर्शने

काठमांडू – चीनने नेपाळलगतच्या सीमेवरील हुमला जिल्ह्यात ११ इमारतींचे बांधकाम केल्यानंतर राजधानी काठमांडूमध्ये चीनविरोधात तीव्र निदर्शने झाली. यावेळी निदर्शकांनी काठमांडूतील चिनी दूतावासाबाहेर ‘गो बॅक चायना’, ‘बॅक ऑफ चायना’च्या घोषणा दिल्या. पंतप्रधान के. पी. ओली यांच्या नाकर्तेपणामुळे चीनने नेपाळमध्ये घुसखोरी करुन आपला भूभाग बळकविल्याचा आरोप या निदर्शकांनी केला. नेपाळमध्ये वाहणार्‍या नदीचा प्रवाह बदलून व कडक हिवाळ्याचा फायदा घेऊन चीन ही घुसखोरी करीत असल्याचे आरोप नेपाळी जनतेकडून होऊ लागले आहेत. त्यातच चीनबरोबर नेपाळच्याच परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळल्यामुळे नेपाळी जनतेमध्ये ओली सरकारविरोधातील असंतोष अधिकच तीव्र होऊ लागला आहे.

चीनच्या विस्तारवादाविरोधात नेपाळच्या जनतेची तीव्र निदर्शनेकाही दिवसांपूर्वी नेपाळच्या हुमला जिल्ह्यातील नामखा पालिकेचे प्रमुख बिष्णू बहादूर तमांग यांनी फोटोग्राफ्स, व्हिडिओद्वारे ‘लिमी लापचा’ भागात चीनने केलेल्या अतिक्रमणाचे पुरावे माध्यमांसमोर उघड केले होते. २००५ साली ज्या भागात झोपड्या होत्या, तिथे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने ११ लष्करी इमारती उभारुन दावा ठोकल्याचा आरोप तमांग यांनी केला. सुरुवातीला या आरोपांसमोर माघार घेणार्‍या चीनने आता सदर आरोप फेटाळून संबंधित भूभाग आपलाच असल्याचे नकाशे प्रसिद्ध केले आहेत. या प्रकरणी नेपाळच्या गृहमंत्रालयाचे पथक सीमेवर पाहणी करण्यासाठी पोहोचल्यानंतर चीनच्या सुरक्षा दलाचे जवान ट्रक, टँकर व जीपने तेथे आले आणि त्यांनी नेपाळी पथकाला निघून जाण्यास भाग पाडले. त्यामुळे नेपाळी जनतेमध्ये चीनविरोधातील संताप वाढत चालला आहे.

चीनच्या विस्तारवादाविरोधात नेपाळच्या जनतेची तीव्र निदर्शनेया पार्श्वभूमीवर, बुधवारी नेपाळच्या भूभागात घुसखोरी करुन जमीन बळकाविणार्‍या चीनविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. नेपाळी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शंकर हमाल यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने पार पडली. यावेळी निदर्शकांनी ‘नेपाळचा भूभाग परत करा’, ‘चीनचा विस्तारवाद बंद करा’ व ‘चीन मुर्दाबाद’च्या जोरदार घोषणा दिल्या. पुढे नेपाळच्या पोलीसांनी बळजबरीने चीनविरोधी निदर्शकांना या भागातून पिटाळून लावले. गेल्या दोन महिन्यात चिनी दूतावासाबाहेर नेपाळी जनतेने केलेली ही दुसरी निदर्शने आहेत. विद्यार्थी संघटनेच्या या निदर्शनांबरोबर नेपाळमधील विरोधी पक्ष ‘नेपाळी काँग्रेस’ने देखील ओली सरकार तसेच चीनच्या या घुसखोरीविरोधात देशव्यापी निदर्शनांचे संकेत दिले आहेत. त्यातच नेपाळ-चीनची सीमारेषा निश्चित करणारे ‘बॉर्डर पिलर्स’ देखील गायब झाल्याच्या बातम्या समोर येत असल्यामुळे ओली सरकार नरमले आहे.

या व्यतिरिक्त तिबेटच्या स्वायत्त भूप्रदेशात रस्त्यांचे बांधकाम करताना, चीनने नेपाळमध्ये वाहणार्‍या नद्यांचा प्रवाह वळविल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. ‘लिमी लापचा’ भागात चीनने अशाप्रकारे नद्यांच्या जवळील जमीन ताब्यात घेतल्याचा दावा केला जातो. ‘लिमी लापचा’ हे एक अतिशय मोक्याचे ठिकाण आहे तेथून कैलास मानसरोवर स्पष्टपणे पाहता येते. काही आठवड्यांपूर्वी याच भागात चीनने भारताच्या विरोधात क्षेपणास्त्रांची तैनाती केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. दरम्यान, ओली सरकार चीनविरोधात कुठलीही भूमिका घेण्यास तयार नसल्यामुळे नेपाळच्या जनतेचा संताप वाढतच चालला आहे.

leave a reply