पूर्व चीनमधील नौदल तळानजिक ‘युएफओ’ दिसल्याचा चिनी दैनिकाचा दावा

बीजिंग – पूर्व चीनमधील शान्डाँग प्रांतात असलेल्या नौदल तळानजिक एक अनोळखी उडती तबकडी (युएफओ) दिसल्याचा दावा एका चिनी दैनिकाने केला. जिआंगगेझुआंग नौदल तळाजवळच्या रिझाओ भागात युएफओ आढळली असून लवकरच ती पाडण्यात येईल, असे वृत्त ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी दैनिकाने दिले आहे. त्याचवेळी 2022 मध्ये दहापेक्षा अधिक वेळा अमेरिकेचे ‘स्पाय बलून्स’ चिनी हद्दीत दिसले होते, असा आरोपही चीनकडून करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेने आपल्या हद्दीत चीनचा ‘स्पाय बलून’ क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उडवून दिला होता. त्यामुळे दोन देशांमधील तणाव जबरदस्त चिघळला असून चीनकडून अमेरिकेला सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. चिनी स्पाय बलूनच्या घटनेनंतर अमेरिकेत तीन ‘युएचएओ’ज्‌‍ची(अनआयडेंटिफाईड् हाय-अल्टिट्यूड ऑब्जेक्ट) प्रकरणे समोर आली आहेत. यावरून चीनकडेही संशयाची सुई वळली आहे.

याच पार्श्वभूमीवर चीनने आपल्या हद्दीतही ‘युएफओ’ आढळल्याचा दावा करून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. चिनी दैनिकांनी आपल्या वृत्तात ‘युएफओ’ उडविण्याची तयारी झाल्याचे सांगितले आहे. मात्र त्यानंतर अनेक तास उलटून गेल्यानंतरही त्याबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अमेरिकेने 2022 साली चिनी हद्दीत अनेक ‘हाय अल्टिट्यूड बलून्स’ पाठवून हेरगिरी केल्याचा आरोपही केला आहे. चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी ही माहिती दिली.

leave a reply