इस्रायलच्या गाझातील हवाई हल्ल्यानंतर हमासची धमकी

जेरूसलेम – गाझापट्टीतून झालेल्या रॉकेट हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी इस्रायलने चढविलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील हमासचा रॉकेट निर्मितीचा कारखाना नष्ट झाला. यामुळे संतापलेल्या हमासने इस्रायलला धमकावले आहे. हमासच्या प्रतिकाराने लवकरच इस्रायलचा पराभव होईल, अशी धमकी हमासचा प्रवक्ता हाझेम कासेम याने दिली.

इस्रायलने दिलेल्या इशाऱ्यानंतरही हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांचे गाझापट्टीतून रॉकेट हल्ले सुरू आहेत. शनिवारी उशिरा गाझातून इस्रायलच्या सीमेजवळ रॉकेट हल्ला चढविला. इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेने सदर रॉकेट इस्रायलच्या हद्दीत कोसळण्याआधीच भेदले. यामुळे मोठी हानी टळली. पण रविवारी सकाळी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमासच्या रॉकेट्सच्या निर्मिती कारखान्यावर हल्ले चढविला. यात जीवितहानी झालेली नाही, पण सदर कारखाना जमिनदोस्त झाल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

यामुळे संतापलेल्या हमासने इस्रायलला धमकावले. ‘वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींवर अत्याचार आणि गाझात हवाई हल्ले चढविणाऱ्या इस्रायलचा लवकरच पॅलेस्टिनींची क्रांती आणि पॅलेस्टाईनच्या प्रतिकारामुळे दारूण पराभव होईल’, असा इशारा हमासचा प्रवक्ता हाझेम कासेम याने दिला आहे.

leave a reply