पाणबुड्यांची निर्मिती करणार्‍या रशियन कंपनीवर चिनी हॅकर्सचा हल्ला

लंडन – रशियन नौदलासाठी आण्विक पाणबुडीचा आराखडा तयार करणार्‍या ‘रूबिन डिझाईन ब्युरो’ या कंपनीवर चिनी हॅकर्सनी हल्ला केला. या हॅकर्सनी रशियन कंपनीने तयार केलेल्या पाणबुड्यांचा आराखडा हॅक करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सायबर सुरक्षेशी संबंधित अमेरिकास्थित गटाने प्रसिद्ध केली. रूबिन डिझाईन ब्युरो ही रशियातील आघाडीची कंपनी असून अकूला श्रेणीतील पाणबुड्यांचा आराखडा याच कंपनीने तयार केला आहे. दरम्यान, पिपल्स लिबरेशन आर्मीशी संलग्न असलेले चिनी हॅकर्स या क्षेत्रातील देशांच्या सरकारी आणि लष्कराची संकेतस्थळे सातत्याने हॅक करीत असल्याचा दावा सायबर सुरक्षेशी संबंधित माध्यमाने केला होता.

‘सायबरिझन नॉक्टर्नस टिम’ या अमेरिकास्थित गटाने रशियन कंपनीवरील हॅकर्सच्या हल्ल्याची माहिती उघड केली. गेल्या आठवड्यात हॅकर्सनी रूबिन कंपनीचे संचालक इगोर व्लादिमिरोविच यांना फिशिंग ई-मेल पाठविला होता. या ई-मेलद्वारे हॅकिंगला सहाय्य करण्यासाठी ‘रॉयलरोड पेलोड’ मालवेयरने भरलेली ‘आरटीएफ डॉक्युमेंट’ची फाईल जोडलेली होती. या हॅकर्सनी पाठविलेल्या सदर डॉक्युमेंटमध्ये स्वयंचलित पाणबुडीचे फसवे आराखडे होते, असे अमेरिकी गटाने म्हटले आहे.

या रॉयलरोड पेलोडद्वारे पोर्टडोअर नावाचे आधी वापरलेले प्रभावी मालवेअर रशियन कंपनीच्या संचालकांच्या कॉम्प्युटर व त्याबरोबर संबंधित नेटवर्कमध्ये सोडण्यात आल्याचा दावा सायबरिझनने केला आहे. पोर्टडोअर मालवेअरचा वापर हेरगिरी, संबंधित कॉम्प्युटरची पूर्ण माहिती काढणे आणि अधिकाधिक मालवेअर पसरविण्यासाठी केला जातो. याआधी रॉयलरोडद्वारे पोर्टडोअर मालवेअरचा वापर चीनच्या हॅकर्सकडून झाला होता, असा आरोप अमेरिकी सायबर सुरक्षा गटाने केला.

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीशी संबंधित टिक, टॉंटो टिम, टीए४२८, गॉब्लिन पांडा, रँकोर आणि नायकॉन या हॅकर्सच्या गटांनी अमेरिकेतील हल्ल्यासाठी याच मालवेअरचा वापर केला होता. त्यामुळे रशियन कंपनीवरील या हॅकिंगमागे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीशी जोडलेले हॅकर्स असण्याची दाट शक्यता सायबरिझनने व्यक्त केली. चिनी हॅकर्सनी रशियन कंपनीतून किती व कोणती माहिती, दस्तावेज हॅक केले, याचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत. पण सदर मालवेअर बराच काळ सिस्टिममध्ये लपून राहून काम करू शकतो, असा दावा अमेरिकी सायबर सुरक्षा गट व यासंबंधीत माध्यमे करीत आहेत.

रूबिन ही रशियाच्या पाणबुडी निर्मिती क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. रशियाच्या अकूला श्रेणीतील आण्विक पाणबुड्यांचा आराखडा रुबिन कंपनीने तयार केला आहे. या अकूला श्रेणीतील पाणबुड्यांचा वापर भारतीय नौदलातही केला जातो. भारतीय नौदलाच्या ताफ्यातील ‘आयएनएस चक्र’ ही ‘अकूला दोन’ श्रेणीतील पाणबुडी आहे. याशिवाय २०२५ सालापर्यंत भारतीय नौदलात याच श्रेणीतील आणखी एक पाणबुडी दाखल होणार आहे. त्यामुळे पिपल्स लिबरेशन आर्मीच्या हॅकर्सचा रूबिन कंपनीवरील हल्ला रशिया तसेच भारतीय नौदलासाठी चिंतेची बाब ठरू शकते.

दरम्यान, चीनच्या लष्कराशी संलग्न असलेले हॅकर्सचे गट गेल्या दोन वर्षांपासून आग्नेय आशियाई देशांच्या सरकारी व लष्करी संस्थांवर हल्ला चढवित असल्याचा आरोप सायबर सुरक्षेसंबंधी माहिती प्रसिद्ध करणार्‍या संकेतस्थळाने केला आहे. यामध्ये चीनचे नायकॉन हा हॅकर्सचा गट आघाडीवर असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम या देशांच्या सरकारी संस्थांना हॅक केल्याचा दावा सदर संकेतस्थळाने केला.

leave a reply