चीनच्या लष्करी नेतृत्वानेच ‘गलवान’चा कट आखला होता – अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचा अहवाल

वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचे आदेश चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनीच दिले होते. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विशेष मर्जीतील आणि चीनच्या वेस्टर्न कमांडचे प्रमुख जनरल झाऊ झोंकी यांच्या आदेशावरून हा हल्ला झाला होता. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, गलवानमधील संघर्षात ठार झालेल्या चिनी जवानांची संख्या व माहिती दडवून ठेवणाऱ्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर चिनी जनता उघडपणे टीका करू लागली आहे.

कोरोनाव्हायरसचा उगम, व्यापारयुद्ध, बुद्धीसंपदेची चोरी, हॉंगकॉंग आणि तैवानच्या मुद्द्यावरून जगभरातील प्रमुख देश चीनच्या विरोधात गेले आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात चीनमध्ये धुमसत असलेला विरोध उफाळून येईल, अशी चिंता ‘पीएलए’मधील जिनपिंग यांच्या समर्थकांना सतावीत आहे. म्हणूनच अमेरिका व अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या भारताला अद्दल घडवण्यासाठी चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांवर हल्ले चढविण्याचा कट आखला होता. सुरुवातीला भारतीय सैन्यावर भीषण हल्ले चढवून त्यानंतर सामोपचाराने हे प्रकरण मिटविण्याची चीनची योजना होती. या कटानुसार, जनरल झोंकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आदेशांवरुनच भारतीय लष्करावर हल्ला चढविण्यात आला होता.

अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या अहवालातून चीनचा हा कुटील डाव उघड झाला आहे. याआधी चीनच्या लष्कराने लडाख भागात घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यावेळीही लडाखमधील आपली लष्करी आक्रमकता यशस्वी ठरेल, असा तर्क चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी मांडला होता. पण भारतीय लष्कराच्या दणक्याने चीनच्या लष्कराची भंबेरी उडाली. भारतीय सैनिकांच्या कारवाईमुळे चीनच्या लष्कराला आपला शस्त्रसाठा व इतर साहित्य तिथेच टाकून पळ काढावा लागला. चीनचा लष्करासाठी ही मोठी नामुष्की ठरली असून चीनच्या सोशल मीडियामध्ये भारतीय सैनिकांवरील या हल्ल्यावर जोरदार टीका होत आहे.

भारताने या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या जवानांची माहिती उघड केली, त्यांना राष्ट्रीय सन्मान दिला. पण चीनची कम्युनिस्ट राजवट आपल्या जवानांबाबतची माहिती दडवित असल्याचा आरोप चीनमधूनच तीव्र होऊ लागला आहे. त्यातच चीनच्या सोशल मीडियामध्ये शवपेट्या घेऊन जाणाऱ्या चीनच्या लष्करी वाहनांचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे चीनच्या जनतेमध्ये कम्युनिस्ट राजवटीविरोधात असलेला संताप वाढत चालला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष व सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख असलेल्या शी जिनपिंग यांच्या विरोधातील टीकेचे सूर अधिकच तीव्र झाले आहेत. त्यामुळे भारतावर कुरघोडी करण्याचा डाव चीनच्या नेत्यावरच उलटल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने या अहवालात केला आहे.

leave a reply