भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडेचार लाखांवर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन दिवसात सुमारे ४५ हजारांनी वाढली असून देशातील या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या साडे चार लाखांच्याही पुढे गेली आहे. मंगळवारच्या सकाळपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ४,४०,२१५ वर पोहोचली होती. तर रात्रीपर्यंत ही संख्या वाढून ४ लाख ५० हजारांच्याही पुढे गेली. चोवीस तासात महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू या तीन राज्यातच सुमारे १० हजार रुग्ण आढळले. वाढत्या कोरोनाच्या साथीचा फैलाव रोखण्यासाठी आणि रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट हा तीन टी वर काम करा, असा सल्ला ‘आयसीएमआर’ने राज्यांना दिला आहे.

मंगळवारी महाराष्ट्रात तब्बल २४८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, तसेच ३,२१४ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत या साथीने ६५ जण दगावले, तर मुंबईनंतर चोवीस तासात सार्वधिक मृत्यूंची नोंद सोलापुरात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात एका दिवसात ४२ जण दगावले आहेत. नाशिकमध्ये १८ जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला. राज्यात या साथीने बळी गेलेल्यांची संख्या ६,५३१ वर पोहोचली आहे, मुंबईतच ३८४४ जण दगावले आहेत. तसेच महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३९ हजारांवर गेली आहे.

दिल्लीत एकादिवसात सार्वधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. चोवीस तासात दिल्लीत ६८ जण दगावले आणि ३९४७ नवे रुग्ण सापडले. यामुळे दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या ६५ हजारांवर गेली आहे. तामिळनाडूत ३९ जण दगावले आणि २,५१६ नवे रुग्ण आढळले.

दरम्यान, जगातील कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ४ लाख ७१ हजारांवर पोहोचली आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या ९१ लाखांच्या पुढे गेली आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या ब्राझीलमधील या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या ११ लाखांवर गेली आहे, तर मध्य अमेरिकन देश मेक्सिकोमध्ये या साथीने एका दिवसात १०४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

leave a reply