सिक्कीमच्या सीमेवर चिनी लष्कराच्या हालचाली

नवी दिल्ली – सिक्कीममधील ‘नकु ला’च्या उत्तरेकडील एलएसीवर चीनच्या लष्कराने मोठ्या प्रमाणात जमवाजमव सुरू केली आहे. या क्षेत्रात भारत आणि चीनच्या लष्कराची झटापट झाली होती, अशी माहिती भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे चीनच्या लष्कराकडून सुरू असलेल्या या हालचालींकडे भारतीय लष्कर अत्यंत सावधपणे पाहत आहे. लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्याने चीनचे डावपेच उधळल्यानंतर, चीनचे लष्कर एलएसीवर दुसर्‍या ठिकाणी आघाडी उघडून भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करील, असा इशारा सामरिक विश्‍लेषकांनी याआधीच दिला होता.

‘नकु ला’च्या एलएसीवर घुसखोरी करू पाहणार्‍या चीनच्या जवानांना भारतीय सैनिकांनी रोखले होते. यावेळी झालेल्या झटापटीत चीनचे जवान मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. लडाखच्या गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये झालेला हा दुसरा संघर्ष ठरतो. यामुळे एलएसीवरील तणाव अधिकच वाढला होता. २० जानेवारी रोजी भारतीय लष्कराने नकु ला येथील या संघर्षाची माहिती उघड केली होती. यामुळे चीन पुन्हा एकदा भारताचा विश्‍वासघात केल्यावाचून राहणार नाही, हा माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषकांनी व्यक्त केलेला संशय प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे.

दरम्यान, नकु लाच्या जवळ चीनचे लष्कर मोठ्या प्रमाणात बांधकाम करीत असल्याची माहिती गेल्या वर्षीच उघड झाली होती. या क्षेत्रात चीन आपली लष्करी वाहने तैनात करण्यासाठी बांधकाम करीत असल्याचे एका अमेरिकी कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्समुळे स्पष्ट झाले होते. आता या क्षेत्रात अधिकाधिक जवान तैनात करून चीन भारतावरील दडपण वाढवू पाहत आहे. चीनच्या हालचालींवर नजर ठेवून असलेल्या भारतीय लष्कराने या क्षेत्रात तोडीस तोड तैनाती केलेली आहे. त्याचवेळी चीनच्या आगळिकीला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचे सांगितले जाते.

२०१७ साली भारत व चीनचे सैन्य डोकलामच्या सीमेवर एकमेकांसमोर खडे?ठाकले होते. भूतानच्या सीमेत शिरून या देशाचा भूभाग बळकावण्याची तयारी चीनच्या लष्कराने केली होती. पण भारतीय सैनिकांनी रोखल्यामुळे चीनच्या जवानांना इथून माघार घेणे भाग पडले होते. डोकलामच्या जवळ असलेल्या नकु ला येथे पुन्हा एकदा भारतीय सैन्य व चीनचे लष्कर एकमेकांच्या समोर खडे ठाकत असल्याचे दिसू लागले आहे. चीनच्या या कुरापतखोर कारवायांमुळे एलएसीवर दोन्ही देशांचा संघर्ष उद्भवू शकतो, असा इशारा भारताचे माजी लष्करी अधिकारी देत आहेत.

leave a reply