रशिया, तुर्की, युएईने लिबियातील लष्करी हस्तक्षेप त्वरीत थांबवावा

- संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेचे आवाहन

संयुक्त राष्ट्र – प्रदिर्घ काळापासून सुरू असलेल्या लिबियातील गृहयुद्धातील रशिया, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशांचा लष्करी हस्तक्षेप बंद झाला पाहिजे, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. या तीनही देशांकडून होणार्‍या लष्करी सहाय्यामुळे लिबियातील संघर्षबंदीचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा ठपका अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत ठेवला. दरम्यान, लिबियातील संघर्ष रोखण्यासाठी युएईने अमेरिकेला सहाय्य करण्याचे जाहीर केले आहे. तर रशिया व तुर्कीने यावर आपली प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

२०११ साली अरब स्प्रिंगच्या आंदोलनात लिबियातील सशस्त्र कट्टरपंथी गटांनी मुअम्मर गद्दाफी यांची राजवट उधळून लावली. तेव्हा या कट्टरपंथी गटांना लिबियन लष्कराने सहाय्य केले होते. पुढच्या काळात संयुक्त राष्ट्रसंघाने लिबियातील सरकार स्थापनेसाठी या कट्टरपंथी गटांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर लिबियातील या कट्टरपंथी गटांच्या आघाडीतून तयार झालेले सरकार आणि लष्करातील एका गटात तणाव निर्माण झाला होता.

लिबियन लष्करातील जनरल खलिफा हफ्तार यांनी या कट्टरपंथी गटांविरोधात बंड पुकारले असून गेल्या अडीच वर्षांपासून लिबियात गृहयुद्ध पेटले आहे. लिबियातील या गृहयुद्धात तुर्की कट्टरपंथी सरकारच्या पाठिशी उभी आहे. तर रशिया व युएई जनरल हफ्तार यांच्या बंडखोर लष्कराला छुपे सहाय्य करीत आहेत. लिबियातील या गृहयुद्धात आत्तापर्यंत अडीच हजार जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी लिबियातील गृहयुद्धातील बळींची संख्या याहून अधिक असल्याचे म्हटले आहे.

संघर्षबंदीनंतरही तुर्की तसेच रशिया व युएईकडून लिबियातील दोन्ही गटांना होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप मानवाधिकार संघटना करीत आहेत. शस्त्रास्त्रांच्या तस्करीबरोबर तुर्कीने सिरियातील दहशतवादी लिबियात उतरविल्याचे याआधी उघड झाले होते. तर रशियाचे कंत्राटी जवान हफ्तार बंडखोरांना सहाय्य करीत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर, संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे उपराजदूत रिचर्ड मिल्स यांनी रशिया, तुर्की व युएईचा स्पष्टपणे उल्लेख करून लिबियातील लष्करी हस्तक्षेप थांबविण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेने केलेल्या या आवाहनाला युएईने प्रतिसाद दिला आहे. लिबियामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेला सहाय्य करण्यास आपला देश तयार असल्याचे राष्ट्रसंघातील युएईच्या राजदूत लाना नुसिबेह यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर लिबियातील इतर देशांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी युएई सहाय्य करील, असेही लाना म्हणाल्या.

दरम्यान, लिबियाची राजधानी त्रिपोलीसह पश्‍चिमेकडील भूभागावर तुर्की समर्थक सराज सरकारचे वर्चस्व आहे. तर लिबियन बंडखोर नेते जनरल हफ्तार यांनी लिबियाच्या पूर्वेकडील भागावर नियंत्रण मिळविले आहे.

leave a reply