आफ्रिकेत प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न करणार्‍या तुर्कीला इजिप्तकडून आव्हान

इजिप्तकडून आव्हानकैरो/अंकारा – तुर्की जनतेला इतिहासातील ऑटोमन साम्राज्याची भव्य स्वप्ने दाखविणार्‍या राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याकडून आपला प्रभाव वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तुर्कीने आफ्रिकी देशांमध्ये अर्थसहाय्य, वैद्यकीय मदत, लष्करी व तंत्रज्ञानविषयक सहकार्य, पायाभूत सुविधांची उभारणी आणि ‘सॉफ्ट पॉवर’च्या जोरावर पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीचा हा वाढता प्रभाव रोखण्यासाठी इजिप्तने हालचाली सुरू केल्या आहेत. आर्थिक व लष्करी सहकार्य तसेच इस्रायल, युएईसारख्या देशांबरोबर आघाडीसाठी पुढाकार घेऊन इजिप्तने तुर्कीला आव्हान दिल्याचे समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी इजिप्तने आफ्रिकेच्या ‘साहेल’ प्रांतात सक्रिय असणार्‍या ‘जी५ साहेल’ या लष्करी आघाडीला प्रशिक्षण देण्यासाठी सहाय्य पुरविले होते. त्यापाठोपाठ मालीमध्ये कार्यरत असणार्‍या शांतीसेनेलाही सहाय्य देण्यात येत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी पश्‍चिम आफ्रिकेतील प्रमुख देश असणार्‍या घानाच्या विशेष दूतांची भेट घेतली असून व्यापारी सहकार्य वाढविण्यासाठी दीर्घ चर्चा केली. इजिप्तच्या संसदेने नुकताच सेनेगल या आफ्रिकी देशात शिष्टमंडळ पाठविण्याचीही घोषणा केली आहे.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांना इस्लामी जगताचे नेतृत्त्व करण्याची सुप्त महत्त्वाकांक्षा असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांनी गेल्या दशकापासून आशिया व आफ्रिका खंडातील इस्लामी देशांमध्ये प्रभाव वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात अर्थसहाय्य, लष्करी व तंत्रज्ञानविषयक सहकार्य, पायाभूत सुविधांची उभारणी, तुर्की संस्कृतीचा प्रभाव ठसविण्याच्या हालचाली यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी तुर्की राष्ट्राध्यक्षांनी येत्या काही वर्षात आफ्रिका खंडाबरोबरील व्यापार ५० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे इरादे व्यक्त केले होते. सध्या हा व्यापार २० अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. तुर्कीने आफ्रिकेतील आपल्या दूतावासांची संख्याही १२वरून थेट ४२ पर्यंत वाढविली आहे.

तुर्कीचा हा वाढता प्रभाव आफ्रिकेसह अरब जगतातील आघाडीचा देश असणार्‍या इजिप्तला चांगलाच खटकला आहे. त्यामुळे तुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी इजिप्तने तुर्कीचे प्रतिस्पर्धी असणार्‍या देशांशी सहकार्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यात इस्रायल, युएई, ग्रीस यासारख्या देशांचा समावेश आहे. गेल्यावर्षी इजिप्तच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तुर्कीच्या सोमालियातील कारवायांना शह देण्यासाठी इस्रायल व सुदानबरोबर आघाडी उभारण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत दिले होते. सेनेगल, लिबिया यासारख्या देशांमधील तुर्कीचे इरादे उधळण्यासाठी इजिप्तने फ्रान्स, युएई तसेच रशियाची मदतही घेतल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही महिन्यात इजिप्त व ग्रीसमधील सहकार्यही वाढत असल्याचे समोर आले आहे. तुर्कीने भूमध्य सागरी क्षेत्रातील ग्रीसच्या हद्दीत आक्रमक हालचाली सुरू केल्या असून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसने इजिप्तबरोबर करारही केला आहे. गेल्या काही वर्षांपासून इजिप्त व ग्रीसमध्ये संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रीसचे संरक्षणदलप्रमुख जनरल कॉन्स्टॅटायनोस फ्लोरोस यांनी नुकतीच इजिप्तला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तुर्कीला सज्जड इशाराही दिला होता.

दरम्यान, गेल्या आठवड्यात इजिप्तच्या यंत्रणांनी राजधानी कैरोतील मुस्लिम ब्रदरहूडचे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याची माहिती दिली असून या प्रकरणात हेल्मी मोआमेन मुस्तफा बिल्जी या तुर्की नागरिकासह चौघांना अटक केली आहे. तुर्की राजवटीच्या निर्देशांवर इजिप्तविरोधात नकारात्मक अहवाल तयार करण्याच्या कारवाया बिल्जी व गटाकडून सुरू होत्या, असा आरोप इजिप्शियन यंत्रणांनी केला आहे.

leave a reply