चीनच्या विमानांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

तैपेई – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यापासून तैवानबाबत आक्रमक भूमिका स्वीकारणाऱ्या चीनने पुन्हा एकदा तैवानच्या हद्दीचे उल्लंघन केले. चीनच्या विमानांनी शुक्रवारी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी करून बराच काळ गस्त घातल्याचा आरोप तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला. चीनच्या विमानांना पिटाळण्यासाठी तैवानने आपली लढाऊ विमाने रवाना केली होती. दोन दिवसांपूर्वीच चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने तैवानच्या आखातातून प्रवास केला होता. ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या ‘वाय-8 एएसडब्ल्यू’ पाणबुडी विरोधी आणि ‘वाय-8’ या टेहळणी विमानांनी 25 डिसेंबर रोजी ही घुसखोरी केली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एअर डिफेन्स आयडेन्टिफीकेशन झोन’ (एडीआयझेड) या तैवानच्या हवाईहद्दीचे उल्लंघन केले. याबरोबर तैवानची हवाई सुरक्षा यंत्रणा अलर्टवर गेली आणि त्यांनी यासंबंधीची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाला दिली.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या विमानांना रेडिओद्वारे संपर्क साधून आपल्या हवाईहद्दीतून माघारी परतण्याची सूचना केली. पण त्यानंतरही चिनी विमानांनी घिरट्या सुरू ठेवल्यानंतर तैवानच्या लढाऊ विमानांनी चीनच्या विमानांना पिटाळून लावले. चीनच्या विमानांच्या या घुसखोरीवर तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने जोरदार टीका केली आहे. तैवानच्या लढाऊ विमानांनी आतापर्यंत चीनच्या विमानांनी आतापर्यंत 4100 वेळा माघारी परतवले आहे. विमानांबरोबर चीनच्या युद्धनौका आणि विनाशिकांच्या तैवानच्या सागरी क्षेत्रातील घुसखोरी वाढल्या आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीलाही चीनने सलग दोन दिवस ‘वाय-8 एएसडब्ल्यू’, ‘वाय-8’ टेहळणी आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी वापरले जाणारे ‘वाय-8 ईडब्ल्यूए’ विमान तैवानच्या हवाईहद्दीत घुसविले होते. चीनच्या विमानांनी एकाचवेळी केलेल्या या घुसखोरीनंतर तैवानने आपल्या हवाईदलाची गस्त वाढविली होती. त्याचबरोबर हवाई सुरक्षा यंत्रणाही सज्ज ठेवली आहे. तैवानच्या हवाईहद्दीत विमाने रवाना करून चीन या क्षेत्रातील तणाव वाढवित असल्याची टीका तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई र्इंग-वेन’ यांनी केली होती.

गेल्या तीन महिन्यांपासून चीनने तैवानबाबत आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. तर महिन्याभरातील चीनच्या विमानांची तैवानच्या हवाई क्षेत्रातील घुसखोरीही वाढली आहे. ज्यो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याच्या बातमीने सुखावलेल्या चीनने ही घुसखोरी वाढविल्याचा दावा केला जातो.

तैवान हा आपला सार्वभौम भूभागअसल्याचा दावा चीन करीत आहे. तर तैवानसह अमेरिकेने चीनचा हा दावा खोडून काढला आहे. त्याचबरोबर ट्रम्प प्रशासनाने तैवानला शस्त्रसज्ज करणे सुरू ठेवले आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या काँग्रेसने तैवानसाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रविक्रीला मंजुरी दिली. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने तैवानवरील दडपण वाढविण्यासाठी तैवानच्या सागरी तसेच हवाईहद्दीतील घुसखोरी वाढविण्यास सुरुवात केली आहे.

leave a reply